Friday, November 22, 2024
HomeNewsराज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा सुरू

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा सुरू

पुरुष व महिला औद्योगिक गटातून राज्यभरातून ११० संघ स्पर्धेत सहभागी

मुंबई, दि. 3 : औद्योगिक व व्यावसायिककामगारांच्या २७ व्या आणि महिलांच्या २२ व्या खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे आज उद्घाटन करण्यात आले.
आमदार कालिदास कोळंबकर, विकास आयुक्त (असंघटित कामगार) डॉ.एच.पी.तुम्मोड, कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खताळ, उपसचिव दीपक पोकळे, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड.अनिल ढुमणे, ज्येष्ठ कबड्डीपटू जया शेट्टी, छाया शेट्टी, भाग्यश्री भुर्के, बाळ वडावलीकर आदी उपस्थित होते.


महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या प्रभादेवी येथील कामगार क्रीडा भवनाच्या मैदानात दररोज सायंकाळी ४ वाजेपासून स्पर्धेचे सामने खेळवले जातील. सोमवार ५ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडेल. पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण आणि महिला खुला अशा तीन गटात सामने खेळवले जातील. राज्यभरातून ११० संघ स्पर्धेत सहभागी झाले असून यात ५७ संघ पुरुष कामगारांचे असून महिला खुला गटातून ५३ संघ सहभागी झाले आहेत.


राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत पहिल्या दिवशी साखळी सामन्यांमध्ये बँक ऑफ बडोदा, पी. डी. हिंदुजा, स्नेहविकास, शिवशक्ती या संघांनी विजयी सलामी दिली.
पुरुष शहर विभागात पी. डी. हिंदुजा वि. रुद्रा असोसिएट्स यांच्यात चुरशीची लढत झाली. हिंदुजाने रुद्रावर ८ गुणांनी मात करत आपले वर्चस्व सिद्ध केले. हिंदुजाच्या प्रथमेश वेके, निखिल पाटील यांनी खोलवर चढाया करत हा विजय खेचून आणला. बँक ऑफ बडोदा वि. माटुंगा वर्कशॉप यांच्यातील लढत बँकेने १२ गुणांच्या फरकासह जिंकली. एकतर्फी झालेल्या या सामन्यात बँक ऑफ बडोदाच्या ऋतिक पाटीलच्या चढाया आणि नितीन पाटीलच्या पकडी लक्षवेधी ठरल्या. या सामन्यात माटुंगा वर्कशॉपच्या हर्षद जळगावकरने केलेले शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले. महिला शहर बाद फेरीच्या सामन्यात, स्नेह विकास वि. जिजामाता यांच्यातील सामना रोमहर्षक झाला. सुरुवातीच्या काही मिनिटात जिजामाताने स्नेहविकासवर गुणांची आघाडी घेत सामन्यावर पकड मजबूत केली होती. त्यावर स्नेहविकासच्या सोनाली पाटीलने केलेली आक्रमक चढाई व प्राची तानवडेने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे जिजामाताला ७ गुणांनी पराभव पत्करावा लागला. धुळ्याच्या शिवशक्ती वि. कणकवलीच्या जय महाराष्ट्र यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीचा ठरला. शिवशक्तीने शेवटच्या काही मिनिटात जय महाराष्ट्रच्या कोमल रणसिंगला बाद करत सामना फिरवला व ३ गुणांच्या फरकाने विजयश्री खेचून घेतली. शिवशक्तीच्या विद्या डोलताडेने केलेली उत्कृष्ट चढाई व पूजा कदमची पकड या सामन्यात निर्णायक ठरली.

संबंधित लेख

लोकप्रिय