Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडविशेष लेख : रानभाज्या म्हणजे माणसांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्गाने दिलेली देणगी

विशेष लेख : रानभाज्या म्हणजे माणसांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्गाने दिलेली देणगी

पोषणयुक्त रानभाज्या : लाल माठ, राजगीरा

महाराष्ट्रात विशेषतः कोकणात व पश्चिम घाटातील मावळखोऱ्यात पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने शिजविल्या व खाल्ल्या जात होत्या, पुर्वी पावसाळ्याचे दिवस कोकणातील व घाटमाथ्यावरील माणसांसाठी अतिशय गरिबीचे व कसोटीचे दिवस असत. अशा परिसरात अगदी मुबलक व फुकट मिळणाऱ्या रानभाज्या शिजवून येथील लोकांचा उदरनिर्वाह चालत असे. या सर्व रानभाज्या औषधी गुणांनी युक्त असल्याने येथील लोकांचे आरोग्यही चांगले राहत असे. रानभाज्यांपैकी कुठल्या भाज्या खाव्यात हे आदिवासी लोकांना माहीत असते. बऱ्याच रानभाज्यांचे गुणधर्म जवळपास सारखेच असतात. प्रत्येक भाजीत लोह, तंतुमय पदार्थ व इतर खनिजे विपुल प्रमाणात आढळतात. त्यामुळे या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त समजल्या जातात. या नैसर्गिक रानभाज्यांमध्ये खते, कीटकनाशकांचा वापर होण्याचा प्रश्नच नसल्यामुळे त्या प्रदूषणमुक्तही असतात.

रानभाज्या म्हणजे माणसांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्गाने दिलेली देणगी आहे. दुर्गम भागातील शेतकरी बांधवांना रानभाज्यांचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांना खूप चांगले माहीत होते. पावसाळा सुरू झाला की काही घरांतील जुन्या-जाणत्या मंडळींच्या नजरा बाजारात भिरभिरत असतात ते याच रानभाज्यांसाठी. बाजारातील एखाद्या कोपऱ्यात आदिवासी महिला तिच्या टोपलीत काही रानभाज्या घेऊन आलेली असते. तिच्याकडे आपल्याला हवी ती रानभाजी मिळाली की बाजाराची खेप सत्कारणी लागल्याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहू लागतो. चवीला रुचकर, औषधी गुणधर्म आणि पौष्टीक असणाऱ्या या भाज्या खावयास मिळणे ही अस्सल खवय्यांसाठी एखाद्या पर्वणीहून कमी नसते. अनेक घरांमध्ये अगदी आवर्जून या भाज्या केल्या जातात.

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटमाथ्यावरील आदिवासी, शेतकरी, शेतमजूर पावसाळ्यात या भाज्या खातात. या भाज्या निसर्गतः उगवतात. कोणत्याही प्रकारची शेती किंवा बियाणे न पेरता पावसाळ्यात पाऊस पडल्यावर निसर्गतःच उगवल्या जाणाऱ्या भाज्या म्हणजे रानभाज्या असे आपण म्हणतो. या रानभाज्या जंगलात, शेत जमिनीच्या कडेला, माळावर, बांधाच्या बाजूला उगवतात. अशा रानभाज्या आरोग्याला पोषक असतात. कोकणात अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या आहेत मात्र त्याविषयी पुरेशी माहिती नाही. आदिवासी, कोळी, ठाकर, कातकरी, भिल्ल आदी दुर्गम भागातील गरिबांसाठी निसर्गाने दिलेला हा पौष्टीक आहार आहे. पूर्वी माळीण मंडळी या भाज्या गावोगावी विकायच्या, श्रावण महिन्यात कोकणात लोक याच पारंपरिक भाज्या खात असत. जुन्या काळातील वयस्कर पिढी नंतर बदलत्या आधुनिक काळात रानभाज्यांचे महत्व नव्या पिढीच्या लक्षात राहिले नाही.



प्रोटिन्सयुक्त आहार आणि मानवी आरोग्य

प्रोटिन मिळवण्यासाठी लोक मुख्यतः मांस आणि मासे यांच्यावर अवलंबून असतात.आता शहरात प्रोटिन्स, कॅल्शियम कमतरता दूर करण्यासाठी गोळ्या, औषधे, तूप, मांस व भाजीपाला मार्केटमधील नगदी पैसा देणाऱ्या भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आधुनिक फार्मिंग,व्यापारी दृष्टीने मांस,पालेभाज्या उत्पादन बाजारात आणले जाते. ग्रामीण व शहरी भागात शाकाहार, मांसाहार बनवण्याच्या चटकदार रेसिपी असूनही उपयुक्त प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम ईई कमतरते अभावी लोकांमध्ये पोषणयुक्त आहार नसल्यामुळे लोक डॉक्टरकडे गर्दी करून उपचार घेत आहेत.

कोरोना काळात प्रत्येकाला निरोगी जीवनाचे महत्व समजले आहे. निरोगी आरोग्यासाठी निसर्गाने निर्माण केलेला रानभाज्यांचा ठेवा जतन केला पाहिजे, रानभाज्यांच्या वापरास प्रोत्साहन देवून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यसरकारच्या कृषी विभागाने रानभाज्या महोत्सव सुरू केले आहेत. परंतु आद्यपही ग्रामीण शहरी भागात रानभाजी खाणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. पालक, मेथी, चुका अशा टिपिकल पालेभाज्या आपण नेहमीच खातो. पण त्या खाताना कुठेतरी तांदुळसा, माठ अशा रानभाज्यांकडे दुर्लक्ष होते. रानभाज्याही आहारात खूप खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे अधूनमधून आपल्या या पारंपरिक भाज्या नेहमीच केल्या पाहिजेत..

मावळच्या सह्याद्रीच्या पठारावर खांडी, कुसुर, सावळा, नागाथली, वडेश्वर या भागात डोंगरमाथ्यावर पावसाळ्यात राजगिरा, माठ या तांबड्या रंगाच्या व कुळई,टाकळा हिरव्यागार रंगाच्या या तीन प्रमुख भाज्या उपयुक्त आहेत. राजगिरा खाऊन तुम्ही प्रोटीनची कमतरता देखील पूर्ण करू शकता. हा प्रोटिनचा चांगला स्रोत आहे,जो शरीरातील पेशींची दुरुस्ती करण्यासाठी आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी ओळखला जातो. प्रोटिनचा उत्तम पर्याय म्हणून राजगिऱ्याचा समावेश केला जाऊ शकतो, हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम जबाबदार आहे. दुसरीकडे राजगिरामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. याच्या सेवनाने हाडे तर मजबूत होतातच पण दात मजबूत होण्यासही मदत होते. राजगिर्‍याच्या पानांमध्ये आणि बियांमध्ये व्हिटॅमिन ए आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय राजगिरा वनस्पतीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि फिनोलिक संयुगे देखील असतात. राजगिरामधील पोषक तत्व निरोगी आहाराचा भाग म्हणून महत्त्वपूर्ण आरोग्य फायदे देऊ शकतात. राजगिरा गॅलिक अ‍ॅसिड आणि व्हॅनिलिक अ‍ॅसिडसह अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे.

राजगिरा भाजी पौष्टिक तसेच स्वादिष्ट असते. ती शरीराला अनेक आजारांशी लढण्यास मदत करते. कारल्याच्या भाजी प्रमाणेच खूप अप्रिय असलेली भाजी म्हणजे लाल माठ. लाल माठाचे महत्व सर्वजण जाणतात पण खाताना मात्र टाळाटाळ करतात. ही भाजी बनवायला अगदी सात ते आठ मिनीटे लागतात. तुम्ही ताट वाढायला घेतली आणि ही भाजी फोडणीला घातलीत तरी ताट वाढून होईपर्यंत मस्त भाजी तयार होते. माठाच्या भाजीत भरपूर फायबर असते, त्यामुळे पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी ही भाजी नियमित खावी. माठाच्या भाजीत व्हिटॅमिन्स आणि खनिजे भरपूर असतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे या घटकांची कमतरता जाणवते. त्यामुळे माठाची भाजी आणि पोळी किंवा भाकरी हा उन्हाळ्यातला परफेक्ट आहार आहे. व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर असते. त्यामुळे केस आणि डोळ्यांसाठी ही भाजी उत्तम आहे. माठाच्या भाजीमध्ये लोह, मँगनीज आणि फोलेटचे देखील योग्य प्रमाण असते.तिन्ही ऋतूत विशेषतः पावसाळ्यात ही भाजी खावी.



शहरात विविध प्रकारच्या भाज्यांच्या रेसिपी आहेत, या सर्व भाज्या मार्केट मध्ये नगदी पीक म्हणून येतात, खते, कीटकनाशके वापरून उत्पादित केलेल्या भाज्यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे शहरी भाजीपाल्यात कमी असतात. रान भाज्या आजही मावळ,मुळशी,खोपोली या पहाडी मुलखात उपलब्ध आहेत, वडेश्वर, खांडी, कुसवली या आदिवासी गावात डोंगरावर या भाज्या उपलब्ध आहेत. निसर्गाच्या कुशीत 300 प्रकारच्या रानभाज्या आहेत,रानातील मेवा म्हणून अंबाडी, चिवळी, केना, शेवगा, सुरण, करवंद, आघाडा, टरोटा, पिंपळ, भूई आवळा, करटोली, राजगुरा, वाघाटे, फांदीची भाजी, कुंजीर भाजी, चमकुराचे पाने, काटसावर, जिवतीची फुलं आणि इतर प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी रास्त भावात उपलब्ध असतात. त्यामुळे शहरातील नागरिकानी आवर्जून रानभाजी खावी,त्यामुळे आदिवासींना पण उत्पनाचे साधन मिळेल.

चंद्रकांत खांडभोर संचालक, वुई टूगेदर फाउंडेशन, मावळ आदिवासी सेवा सक्षमीकरण केंद्र. नागाथली

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय