Monday, May 20, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : थॅंक्यु मोदीजी... 

विशेष लेख : थॅंक्यु मोदीजी… 

आज आपल्या देशाचे ऐतिहासिक सर्वोत्कृष्ट पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस भाजप कडून हा वाढदिवस ‘थॅंक्यु मोदीजी’ म्हणत साजरा होत असतो. दोन वर्षांपूर्वी तर भाजपकडून मोदींजींना ‘थॅंक्यु मोदीजी’ लिहिलेले ५ कोटी पोस्ट कार्ड पाठविण्यात आले होते. देशाच्या अशा सर्वांगीण ओहोटीला कारणीभूत असणाऱ्या महान नेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देशवासियांना उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम थॅंक्यु मोदीजी… Thank you Modiji …

नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करतांना ६०० शेतकरी मेले हरकत नाही, शेकडो जखमी झाले पर्वा नाही पण शेतकऱ्यांच कल्याण झालं पाहिजे याकरिता शेतकऱ्यांसाठी त्यांची इच्छा नसतांना ३ कृषी कायदे आणून त्यांच जबरदस्ती कल्याण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी थॅंक्यु मोदीजी. ह्या कायद्याला विरोध करणाऱ्या ७०० मूर्ख शेतकऱ्यांना यमसदनी धाडणाऱ्या मा.पंतप्रधानांच्या वाढदिवसाला ‘किसान सन्मान दिन’ साजरा करणे किती यथायोग्य आहे हे भाजप किसान मोर्च्या ने दाखवून दिलं आहे.

पंजाबमधले सहा हजार शेतकरी परिवार असे आहेत ज्यांची एकुलती एक मुले युद्धात किंवा सीमेवरील चकमकीत मारली गेलीत. म्हणजे ६००० परिवार सैन्यात भरती होऊन निर्वंश झालेत. त्यांचा वंश चालविणारा कोणी उरला नाही तरी ते शेतकरी अजूनही आपल्या मुलांना सैन्यात पाठवतातच. ह्या अशा मूर्ख देशभक्तांना हे किसान नाहीत तर हे खालीस्थानी, पाकिस्तानी, आतंकवादी, देशद्रोही आहेत असा खरा सन्मान मिळवून देण्यासाठी थॅंक्यु मोदीजी.

कोरोना जगभरात पसरल्यानंतर सुद्धा अमदाबादला लाखो लोकांच्या उपस्थितीत नमस्ते ट्रम्प कार्यक्रम घेतला. मध्य प्रदेश मध्ये सत्तांतर घडवून आणलं. आधी कोरोनाला आत देशात येऊ दिल मग त्याच्यावर हल्ला करण्यासाठी एक दिवस अचानक लॉकडाऊन करून टाकलं. आता कोरोना पळेल कुठे? लाखो मजुरांचे झाले असतील हाल या अचानक लॉकडाऊन मुळे, मेले असतील शेकडो मजूर पायपीट करत. पण त्यांना स्वतः कळायला नको की जगात कोरोना वाढतोय तर आधीच आपापल्या घरी निघून जावं? लोकांना पण वेळेवरच सर्व पाहिजे. आधी काहीच सांगत नाहीत. वेळेवरच चांगला इलाज पाहिजे, ऑक्सिजन आणि वेंटीलेटर बेड पाहिजे. अरे आधी सांगितलं असत तर नसती दिली चायनाच्या कंपनीला ३००० कोटी रुपयांची सरदार पटेलांचा पुतळा बनविण्याची ऑर्डर. थांबवलं असत राम मंदिर आणखी दोन वर्ष. थांबवलं असत सेंट्रल व्हीस्टा बांधकाम. आधी सांगत नाही आणि मग वेळेवर म्हणता ऑक्सिजन नाही भेटला म्हणून इतके मेले, बेड नव्हता म्हणून तितके मेले. ह्या सर्व उणिवांवर एकच मास्टरस्ट्रोक म्हणजे २० हजार कोटींचं अदृश्य कोरोना पॅकेज दिल्याबद्दल थँक्यू मोदीजी.

मार्च २०१४ मध्ये भारत सरकारवर ५४ लाख ९० हजार कोटी रुपये कर्ज होते. या वर्षीपर्यंत म्हणजेच फक्त ९ वर्षात हा कर्जाचा बोजा १५५ लाख कोटी रुपयांच्या वर घेऊन जाणे ही सोपी गोष्ट नाही. फक्त ९ वर्षात देशावरील कर्ज तिप्पट करून कुणालाही दिसणार नाही असा देशाचा गुप्तपणे विकास करण्याकरिता थँक्यू मोदीजी.

मोदीजींनी सर्व सरकारी कंपन्या विकून त्यांचं खासगीकरण करून आरक्षणच बंद करून टाकलं. यांना आरक्षण द्या-त्यांना आरक्षण द्या या अशा सर्व भेदभाव पसरविणाऱ्या झंझटीतून भारतीय जनतेला मुक्त करण्याकरिता थँक्यू मोदीजी. देशात कधीच नव्हती इतकी बेरोजगारी ७ च वर्षात निर्माण करण्यासाठी आणि बेरोजगारी चे आकडे जाहीर करणे बंद करून देशातून बेरोजगारी च गायब करण्यासाठी थॅंक्यु मोदीजी.

आजही अनेक जवान सीमेवर आतांकवाद्यांच्या हल्ल्यात मरत असतील पण अचानक नोटबंदी करून नकली नोटा आणि आतंकवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी थॅंक्यु मोदीजी.

या अगोदरचे मनमोहनसिंग सरकार ९२५ रुपयांचे गॅस सिलिंडर फक्त ४५० रुपयांना, १०५ रु.चे पेट्रोल ६८ रुपयांना आणि १५० रु.लिटर च खाण्याच तेल ७२ रुपयांना विकून जनतेला मूर्ख बनवत होती. ह्या तिन्ही गोष्टींची खरी किंमत आम्हाला माहीत करून दिल्याबद्दल थॅंक्यु मोदीजी.

काहीही काम नसतांना विनाकारणच आपल्या खात्यात पैसे काढ-घाल करणाऱ्या आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या सामान्य नागरिकांवर बँकेच्या ४ व्यवहारानंतर प्रत्येक व्यवहारावर सर्व्हिस चार्ज लावून आणि खात्यात मिनिमम बँलन्स नसले तर त्यावर दंड आकारून ह्या बँकेला त्रास देणाऱ्या सामान्य नागरिकांकडून हा १५०० कोटी रुपयांचा दंड वसूल करून त्यांना धडा शिकवल्याबद्दल थँक्यू मोदीजी.

देशात लसींचा तुटवडा असतांना आणि देशातील नागरिक कोरोनाने मरत असताना ४.५ कोटी डोज पाकिस्तानला व पाकिस्तान-बांगलादेश सोबत १४ देशांना सुद्धा पुरवून भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी थॅन्क्यु मोदीजी.

मागील वेळीच बचत ठेवीवर (फिक्स डिपॉझिट) वरील मिळणारं व्याजदर सरकारने कमी केलाय तो दर ५% असल्यामुळे नोकरदारांना आपल्या पी. एफ. मध्ये अधिक गुंतवणूक सुरु केली होती. पण ही लोकांची चालाकी लगेच ओळखून आता पी.एफ. (भविष्य निर्वाह निधी) वरसुद्धा टॅक्स लावण्यासाठी थॅन्क्यु मोदीजी.

आधी जसे मोदीजींचे प्रचारक सांगत असत की मुस्लिमांच्या ’हज’ यात्रेला सबसिडी आहे परंतु हिंदुस्तानात हिंदूंचेच महत्वाचे धार्मिक स्थळ असलेल्या ’वैष्णोदेवी’ व ’अमरनाथ’ यात्रेला सबसिडी नाही. तर मित्रांनो, फक्त ९ च तर वर्ष झालेत हो. बस अजून एकदा मोदीजींना निवडून दिल की लगेच ते वैष्णोदेवी व अमरनाथ यात्रेवर सबसिडी सुरु करणार आहेत. काँग्रेस काळात मुस्लिमांसाठी सुरु झालेल्या योजना ज्या अजूनही तशाच सुरु आहेत त्या योजनादेखील बंद करून टाकणार आहेत. चीन ला तर आता फक्त लाल आंख करून नाही तर घरात घुसून मारणार आहेत आणि आपली बळकावलेली जमीन परत घेणार आहेत. ’बँक ऑफ चायना’ ला भारतात दिलेली मान्यता रद्द करणार आहेत. इतिहासात सर्वात जास्त सैनिक या मागील ७ वर्षात सीमेवर का मारले गेलेत याचा शोध घेणार आहेत आणि पुलवामा हल्ल्याचे सूत्रधार कोण याचाही पत्ता लावणार आहेत. राम मंदिर जमीन घोटाळ्याची सुद्धा चौकशी लावणार आहेत. २०२४ मध्ये इतकं सर्व तुम्ही कराल त्याकरिता आधीच थँक्यू मोदीजी.

चवथ्या वर्गातल्या १० वर्षीय चिमुकल्यांवर मोदीजींच्या सरकारविरोधी नाट्य सादर करण्यासाठी गुन्हे दाखल केले. आतंकवाद्यांसह जम्मुत रंगेहात अटक झालेल्या, देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या पोलीस अधिकारी देवेंद्र सिंह सारख्या अधिकाऱ्याला जमानत देऊन टाकली. गोल्ड मेडल विजेत्या महिला मल्लांनी इतके गंभीर आरोप करूनसुद्धा ब्रजभूषण सिंगला एकदाही साधी अटक होऊ दिली नाही या तिन्ही घटनांमधून देशातील न्यायव्यवस्था अजून जिंवंत आहे हे दाखवून दिल्याबद्दल थँक्यू मोदीजी.

अगोदर उद्योगपती आपल्या एकूण नफ्याच्या ७% रक्कम देणगी म्हणून देऊ शकत असे. परंतु मोदीजींनी ज्या सर्व मर्यादा हटवून आता उद्योगपती आपल्या नफ्याच्या १००% निधी राजकीय पक्षांना देऊ शकतील अशी व्यवस्था केली. इतकेच नव्हे तर आधी राजकीय पक्षाला हा निधी कुणी व किती दिला? चेक दिला की कॅश दिला? हे माहितीच्या अधिकारात कुणीही विचारू शकत असे परंतु मोदीजींनी माहितीच्या अधिकारातून हा विषय काढून टाकला. पीएम केअर्स फंड सरकारी आहे असे सांगून मोदीजींनी निधी गोळा केला आणि जेव्हा माहितीच्या अधिकारात माहिती विचारली गेली तेव्हा हा पीएम केअर्स फंड मोदीजींनी एका मिनिटात सरकारी चा प्रायव्हेट करून टाकला. ह्या अशा अत्यंत पारदर्शक कारभाराकरिता थँक्यू मोदीजी.

मोदीजींनी जम्मू-काश्मीर मधील कलम ३७० हटविल्यापासून वर्षभरात तब्बल २ लोकांनी जम्मू-काश्मीर मध्ये जागा घेतली आहे. समस्या नंतर येतात त्याअगोदर मोदीजी उपाययोजना तयार करून ठेवतात. मोदीजींनी राफेल विमान खरेदीची घोषणा केली त्याच्या १३ दिवस अगोदरच अनिल अंबानींची डिफेन्स कंपनी स्थापन झाली होती. अमर्यादित शेतमालाच्या साठवणुकीची सूट देणारे ३ कृषी विधेयक येण्या अगोदरच ’अदानी ऍग्री लॉजिस्टिक’चे देशात शेकडो गोडावून तयार होते. ह्या दूरदृष्टीसाठी थँक्यू मोदीजी.

न्यायव्यवस्था सरकारचे ऐकत नाही म्हणजे काय? न्यायव्यसस्थेत हस्तक्षेप करून न्याय कसा केला पाहिजे हे मोदीजींच्या सरकारने त्यांना शिकवले. राष्ट्रपती-राज्यपालांसारख्या संवैधानिक पदांचा व इडी, सीबीआय, आयकर विभाग अश्या सरकारी संस्थांचा विरोधकांना नामोहरम करण्यासाठी कोणतीही नैतिकता न पाळता कसा गैरवापर करावा हे भारतीय राजकारण्यांना शिकविण्याकरिता थँक्यू मोदीजी.

लाख अपराधी सुटले तरी चालतील पण एकही निरपराधी सुटता कामा नये असा उदात्त विचार या जगाला देण्यासाठी थॅंक्यु मोदीजी.

चांगल्या लोकांना तर सर्वच लोक जवळ करतात पण देशातल्या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना जवळ करून त्यांचे पापक्षालन करून त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून समानतेचा संदेश देण्यासाठी थॅंक्यु मोदीजी.

सरकारला पाठिंबा म्हणजे देशभक्ती व सरकारला विरोध म्हणजे देशद्रोह ही नवीन व्याख्या निर्माण करण्यासाठी थॅंक्यु मोदीजी.

देशात उपाशी झोपणाऱ्यांची संख्या गेल्या ४ च वर्षात दुप्पट झाली आहे. त्याचबरोबर मनमोहनसिंग सरकारच्या काळात जे २७ करोड लोक तुम्हाला न विचारता गरिबीतून वर आले होते त्यातील तब्बल २३ करोड लोकांना पुन्हा दारिद्र रेषेखाली ढकलण्यासाठी थँक्यू मोदीजी.

मोदीजी आल्यापासून मुली-स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांना वेगळ्याच प्रकारे हाताळल्या जातंय. उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेवरआणि तिच्या कुटुंबियावरच गुन्हे दाखल केले गेले. पीडितेच्या वडिलांना कारागृहातच तिच्या काकू, मावशी आणि ड्रायव्हर ला अपघातात मारून टाकलं गेलं. हाथरस पीडितेचे प्रेत घरच्यांच्या मर्जी विरोधात तिच्या घरच्यांना कोंडून रात्री २.३० वाजता पोलिसांकडून जाळून टाकण्यात आलं. कठुवामध्ये ८ वर्षीय आसिफावर अत्याचार झाले आणि बलात्काऱ्यांच्या समर्थनार्थ स्थानिक बार असोसिएशन चे अध्यक्ष- सदस्यांनी, सत्ताधारी आमदार व मंत्र्यांनी तिरंगा हातात घेऊन भारतमाता की जय म्हणत बलात्काऱ्यांना पाठिंबा जाहीर केला. बिलकीस बानो च्या बलात्काऱ्यांची शिक्षा माफ करून त्यांना सन्मानाने तुरुंगातून मुक्त केले, वनिता फोगाट-साक्षी मलिक यांच्यावर अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घालून या पीडितांना रस्त्यावरून घासत नेण्यात आले. मणिपूर च्या भगिनींची नग्न धिंड काढण्यात आली. बलात्कार करण्यात आला त्यावर बोलताना तुम्हाला किती कष्ट पडले ते अख्ख्या देशाने बघितले मोदीजी. अशाप्रकारे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ नाऱ्याचा खरा अर्थ देशाला समजून सांगितल्याबद्दल थॅंक्यु मोदीजी.

या देशातील १९ लाख ईव्हीएम मशीन गायब झाल्या, सरकारी छापखान्यातून ८८ हजार कोटी रुपयांच्या नोटा गायब झाल्या, केदारनाथ मंदिरातील सोने पितळेत परावर्तित झाले असे अनोखे चमत्कार या कलियुगात भारतीय जनतेला दाखविण्यासाठी थॅंक्यु मोदीजी.

गौतम अदाणींच्या कंपनीत २० हजार कोटी कुणाचे आले असा तुमच्या मित्राच्या विरोधातील प्रश्न संसदेत विचारण्याची हिम्मतच कशी होते? असा प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधींच्या निलंबनाची सोय झालीच पाहिजे ना? नियम मोडून ६ विमानतळे अदाणींना, तुमच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर बांग्लादेशाला वीज पुरविण्याचा ठेका अदाणींना, श्रीलंकेला वीजपुरवठा करण्याचा ठेका अदाणींना, धारावीच्या पुनर्विकासाचे कंत्राट अदाणींना, हजारो कोटींचे कर्ज अदानींचे माफ करत देशासमोर मैत्रीचा एक आदर्श निर्माण करण्यासाठी थँक्यू मोदीजी.

मोदीजींनी १८-१८ तास काम करून देश स्वतंत्र झाल्यापासून सर्वात जास्त म्हणजे २४ पेक्षा जास्त कंपन्या आतापर्यंत विकून त्यातून देशासाठी पैसा उभा केला आहे. अर्थव्यवस्था डबघाईस आणली. परराष्ट्र संबंध खराब केले. ५७० कोटींचं राफेल विमान १६७० कोटींना विकत घेतलं. देशात हिंदू-मुस्लिम द्वेष वाढेल असं वातावरण निर्माण केलंय. स्टेडियमला सरदार पटेलांसारख्या महापुरुषाचे नाव बदलून स्वतः चे नाव दिले. कुंभ मेळ्याला परवानगी दिल्याने शेकडो साधूंना कोरोनामुळे कुंभात मरण आलं. म्हणजे त्यांना मोक्षप्राप्ती करून दिली. भले त्यांना पुरायला नदीकाठी जागा कमी पडली असेल पण त्यांना मोदीजींनी स्वर्गात जागा कमी पडू दिली नाही त्याबद्दल थँक्यू मोदीजी.

मला तर अनेकदा हे प्रश्न पडतात की मानव प्राण्याची उत्पत्ती मोदींशिवाय झालीच कशी? मानवाची उत्क्रांती झालीच कशी? हा देश आतापर्यन्त बिना मोदींचा चाललाच कसा ? देश मोदींविना स्वतंत्रच कसा झाला? मोदीजी नसते तर आज आपण कुठे असतो? हा विचार करूनच गहिवरून येत. तुम्ही सत्तेवर येऊन ‘न भूतो न भविष्यती’ असा पंतप्रधान आणि असे ‘अच्छे दिन’ याची देही याची डोळा पाहण्याची संधी दिल्याबद्दल ढोपरापासून हात जोडून थँक्यू मोदीजी.

– चंद्रकांत झटाले, अकोला

7769886666

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय