Saturday, May 4, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषविशेष लेख : कोळी महादेव चौथरा इतिहास

विशेष लेख : कोळी महादेव चौथरा इतिहास

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पुर्व व पश्चिम उतारांवर कोळी – महादेव, ठाकर व कातकरी या जमातींचे प्राचिन काळापासुन वास्तव्य असल्याचे ऐतिहासिक पुरावे सापडतात.

सह्याद्रीच्या पर्वत रांगांत दक्षिणेला मुळा खोऱ्यापासून उत्तरेला त्र्यंबकेश्वर पर्यंत कोळी – महादेव, ठाकर व कातकरी यांची सलग वस्ती आढळते. या प्रदेशातील बावन्न मावळांवर कोळी – महादेव नाईकांचे वर्चस्व होते. जुनेर म्हणजेच जुन्नर येथे ‘बावन्न चावडी येथुन बावन्न मावळांचा कारभार पाहिला जात होता. 

प्रत्येक मावळाचा एक नाईक या प्रमाणे बावन्न नाईकांवर एक सरनाईक असे तो कोळी – महादेव राज्यांचा प्रमुख असे. सन १४७० पर्यंत जुन्नर प्रांत व शिवनेरी किल्ला कोळी – महादेव व ठाकर यांच्या अधिपत्याखाली असल्याचे दिसून येते. विजय नगरचे राजे व बहामणी सुलतान यांनी या जमातीचे स्वातंत्र्य मान्य केले होते. 

बहामणी राज्याच्या विभाजनानंतर मल्लीक अहमद बहारी याने आपले स्वातंत्र्य घोषीत केले. त्याने जुन्नर प्रांतावर आक्रमण करून हा प्रांत जिंकून घेतला, अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करून जुन्नर ही पहिली राजधानी बनवली. यामुळे कोळी महादेव जमातीची पिछेहाट होऊन त्यांनी डोंगराळ भागात आश्रय घेतला. 

याच दरम्यान १५९६ साली मुघलांनी शहाजहान बादशहाच्या नेतृत्वाखाली दख्खनवर स्वारी केली. नंतर १६३६ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीचा अस्त झाला. त्यामुळे जुन्नर प्रांतावरील मुस्लीम राज्यवटीची पकड ढिली पडली. 

सन १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी गडावर जन्म झाला. तेव्हा जुन्नर प्रांताचा सरनाईक खेमा रगतवान ( खेमी नाईक ) हा कोळी – महादेव होता. त्याच्या नेतृत्वाखाली कोळी – महादेव व ठाकर यांनी जुन्नर प्रांतात उठाव केला व शिवनेरी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. 

सन १६५० मधील ही घटना या प्रदेशात कोळी – महादेव व ठाकर जमातींचे वारंवार होणारे उठाव व कोळी – महादेव जमातीने छत्रपती शिवाजी महाराजांच्याप्रती दाखविलेली निष्ठा.

यामुळे विजापूरचा आदिलशहा व मोगल संतप्त झाले होते. कोळी – महादेव व ठाकर यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोगलांनी मोठे सैन्य पाठविले. शिवनेरी किल्ल्याला वेढा देण्यात आला. सरनाईक खेमा (खेमी) व त्याच्या आदिवासी विरांनी पराक्रमाची शर्थ केली. परंतु मुघलांच्या प्रचंड सैन्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. खेमा नाईक कुटूंबिय व त्याच्या सहकार्यांना पकडण्यात आले. 

खेमा नाईक यांचे कुटुंबिय व इतर आदिवासी विरांचा शिरच्छेद करण्यात आला. सर्व शिर एकत्र करून त्यावर एक चबुतरा बांधला त्यालाच काळा चौथरा अथवा कोळी चौथरा असे म्हणतात.

हे करण्यामागे मोघलांचा एवढाच उद्देश होती की, यामुळे कोळी – महादेवांवर दहशत बसेल व परत ते कोणताही उठाव करणार नाही. ही जागा म्हणजे कोळी – महादेव व ठाकर विरांच्या सामुहिक कत्तलीची / संहाराची जागा आहे. कोळी – महादेव व ठाकर यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी, मातृभूमीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले व सर्वस्वाचा त्याग केला. इतिहासाने मात्र या आदिवासी विरांच्या बलिदानाची दखल घेतली नाही. आदिवासींप्रमाणे त्यांच्या पराक्रमाचा इतिहास सुध्दा वंचित व दुर्लक्षित राहीला हीच शोकांतिका आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय