Friday, May 3, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : कातकरी जमातीची सद्यस्थिती - स्नेहल साबळे

विशेष लेख : कातकरी जमातीची सद्यस्थिती – स्नेहल साबळे

भारतात डिजीटल  इंडियाचे वारे वाहत आहे.स्मार्ट सिटी,बुलेट ट्रेन तसेच नवनवीन शोध लागत आहेत. मानव  मंगळ ग्रहावर वास्तव्य करू शकतो का? यांचेही संशोधन सुरु आहे. देश मंगळावर पोहचला आहे. आज देश प्रगतीच्या मार्गावर आहे. खरतर हि अत्यंत गर्वाची गोष्ट आहे.कृषी,शिक्षण,आरोग्य ,विज्ञान-तंत्रज्ञान,रस्ते,वाहतूक इ.अशा प्रत्येक क्षेत्रात देशाने प्रगती केली आहे. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षामध्ये अनेक पक्षांची सरकारे आली आणि गेली. काही खेड्यांचा,शहराचा विकास ही झाला.अन्न, वस्र ,निवारा यांसारख्या मुलभूत सुविधा काही गावात,शहरात,पोहोचल्या. त्या त्या काळात तत्कालीन सरकारांनी अनेक योजना आणल्या खर! पण त्या समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचल्या का? अनेक ठिकाणी वेगवगळ्या उपाययोजना राबविण्यात आल्या हि आणि त्यामुळे काही प्रमाणात त्या पोहोचल्या हि असतील.पण ७२ वर्षानंतर ही काही गावे,आदिवासी जमाती या उपेक्षितांचे जगणे जगत आहे. त्यांच्या अन्न,वस्र,निवारा या मुलभूत गरजा ही पूर्ण होऊ शकल्या नाहीत.या समाजाची सद्यस्थिती  हि त्यांच्या पाड्यावर /वस्तीवर ,गावांना भेटी दिल्याशिवाय समजत नाही. 

निसर्गाच्या सानिध्यात असलेली , आदिवासी कातकरी जमात ही महाराष्ट्रातील आदिम, अप्रगत जमात म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील पुणे, रायगड, ठाणे ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर या जिल्ह्यामध्ये कातकरी जमात वास्तव्यास आहे. आदिवासी कातकरी जमात ही डोंगर,नद्या, धरणे,ओढे यांच्या बाजूला वस्ती करून राहते.काथोडी, कातकरी,कातवडी या नावाने ती ओळखली जाते. त्यांच्या कात करण्याच्या व्यवसायावरून त्यांना कातकरी असे नाव पडले आहे.पण आज या समाजाची सद्यस्थिती  वेगळीच पहायला मिळते. इंग्रज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कातकरी जमातीचा कात तयार करण्याचा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे या समाजाचे उपजीविकेसाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले.त्यांची आजची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांच्या प्राथमिक गरजा हि पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. पोटाची भूक भागवण्यासाठी रोजगाराच्या शोधात या आदिवासी कातकरी जमातीचे लोक वर्षानुवर्षे स्थलांतर, भटकंती यामुळे ते अर्धे-भटके,दारिद्र्य,शोषित,मजूर म्हणून जगत आहेत. उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे मासेमारी हा व्यवसाय  होय. आज कातकरी समाज वीटभट्टी, कोळसा भट्टी,नदीतील आणि खाडीतील वाळू काढणे,मिठागरांचे राखण करणे,दारू काढून विकणे,लोकांच्या शेतात शेतमजूर म्हणून जाणे,फळांच्या हंगामात चिंचा झोडणे,आमराई राखणे ,अशी कामे करतात.एकेकाळी कात निर्मिताचा व्यवसाय करणारी जमात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या जमातीवर मजूर म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. कामाच्या ठिकाणी काम करत असताना त्यांचे शोषण आणि पिळवणूक होत आहे. सतत स्थलांतर असल्यामुळे हा समाज संघटीत झालेला दिसत नाही. अशिक्षितपणामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होतेच पण कामाच्या ठिकाणी महिलांच्या शोषणाचे प्रमाण ही अधिक आहे.

कातकरी आजही कुडाच्या घरात राहतात.काही गावात घरकुल योजनामुळे घरकुले मिळाली आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पत्र्यांची घरे बांधून मिळाली आहे. आरोग्याच्या सुविधा तर त्यांच्या पर्यत कधीच पोहचल्याच नाहीत. सदृढ राहण्यासाठी पौष्टीक सकस आहाराची गरज असते हे देखील त्यांना माहित नाही. कारण या गोष्टी कधी त्यांच्या पर्यत पोहचल्याच नाही.रोज काम करून मिळेल तेच खायचे आणि जगायचं.हे त्याचं रोजचं आयुष्य. आजच आज आणि उद्याच उद्या या पद्धतीने जगणारा कातकरी समाज होय. त्यामुळे लहान मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. महिलांना बाळंतपणात ही योग्य आहार मिळत नाही. कातकरी जमातीसाठी सरकारी  योजना आहेत. पण तरीही अनेक ठिकाणी या योजना पोहचल्या नाहीत. त्यांच्यासाठी योजना तर आहेत पण त्यांच्याकडे त्यांच्या अस्तीवाचे पुरावेच नाहीत. स्थलांतरामुळे अनेक ठिकाणी त्यांच्या नोंदीच नाहीत. आज हि कातकरी जमाती मध्ये बाळंतपणे हे परंपरागत पद्धतीनेच म्हणजेच सुईणकडूनच केली जातात.जर एखादे बाळंतपण अवघड असेल तर दवाखान्यात जातात.मासिक पाळीत अजून हि कापडाच वापर केला जातो.सॅनिटरी नॅपकीन, पॅड अजून हि त्यांच्या पर्यत पोहचले नाहीत.महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी,निगा कशी राखावी याविषयी काहीही जागृती नाही. त्यांच्या पर्यंत आधुनिक पद्धती पोहोचल्याच नाहीत. महिलांची पोषकस्थिती कमकुवत आहे.कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. आरोग्याच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी सरकारी आरोग्य व्यवस्था हि अपयशी ठरत आहेत.

कातकरी जमातीमध्ये आता कुठे पहिली पिढी शिक्षणाच्या प्रहावात येऊ पाहत आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत आहेत. त्याचेही प्रमाण खूपच कमी आहे.स्थलांतरामुळे शिक्षण घेता येत नाही. शिक्षणाचे महत्व त्यांच्या पर्यंत पोहचले नाही. थोड्या फार प्रमाणात  शिक्षण त्याच्या पर्यंत पोहचले आहे. त्यांची इच्छा जरी असली तरी पुढील शिक्षणासाठी लागणारा अवाढव्य खर्च यामुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे यापुढे तर शिक्षण घेतील कि नाही, याचीही  हि शास्वती नाही.कारण सरकारने आणलेले नवीन शैक्षणिक धोरण यामुळे हा समाज वंचित राहतो कि काय हा प्रश्नच आहे.या जमातीमध्ये उच्च शिक्षण घेणारे पहिले व्यक्ती म्हणजे रविंद्र भूरकुंडे (Phd) हे  आहेत. अशिक्षितपणा ,अर्थिक स्थिती व मुलभूत गरजा पूर्ण न झाल्यामुळे व्यसनाचे प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त दिसून येते. पुरुषांबरोबर, स्रिया , तरूण मुले – मुली हि व्यसनाच्या आहारी गेलेली दिसून येतात. 

आदिवासी कातकरी जमातीत शिक्षण ,रोजगार ,आरोग्य  या मुलभूत गरजा याच्यापासून वंचित आहे.शासनाच्या अनेक उपाययोजना या कातकरी जमातीसाठी आहेत. परंतु त्या योजना त्यांच्यापर्यंत का पोहोचल्या नाहीत? त्या योजना त्यांच्या पर्यंत कश्याप्रकारे पुरवता येतील. या गोष्टींचा जबाबदारपणे प्रश्न सोडवला पाहिजे. आदिवासी कातकरी जमातीने संघटीत होणे आवश्यक आहे. कातकरी समाजाला त्यांचे शोषण, पिळवणूक,अन्याय होत आहे.याची जाणीव जोपर्यंत होणार नाही, तसेच  शिक्षणाचे महत्व पटवून दिल्याशिवाय या समाजाचा विकास होऊ शकत नाही.रोजगार मिळाला,उपलब्ध करून दिला तर कातकरी जमातीचे स्थलांतर थांबेल.यामुळे अनेक प्रश्न हि सुटतील. असे वाटते.  

स्नेहल जयराम साबळे 


( लेखिका पुणे विद्यापीठात पीएचडी करत आहेत.)

[email protected]

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय