आळंदी/अर्जुन मेदनकर : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता समारोह आणि पुण्य पवित्र अधिकमास सांगता समारोह या सुवर्ण परवा निमित्त वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात प्रथमच श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत होत असल्याचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर, संस्थेचे खजिनदार दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले.
ऑगस्ट क्रांती दिन ते भारतीय स्वातंत्र्य दिन या कालावधीत कथा प्रवक्ते हरिभक्त परायण गुरुवर्य आदिनाथ महाराज फपाळ यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या हृदयस्पर्शी वाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ श्रवणाची संधी भाविक नागरिकांना लाभणार आहे. सोहळ्यात संध्याकाळी आठ ते दहा या वेळेत स्थानिक भजनी मंडळाच्या वतीने हरिजागर सेवा होणार आहे. तसेच शनिवारी ( दि. १२ ) रोजी सकाळी दहा वाजता हरिभक्त परायण परमेश्वर महाराज फपाळ यांचे एकादशी दिनी कीर्तन सेवा होणार आहे.
१५ ऑगस्ट रोजी भागवत कथा समाप्ती निमित्त दिंडी मिरवणूक आणि श्रीमद् भागवत ग्रंथ पूजन, हरिपाठ, दीपोत्सव होणार आहे. बुधवार ( दि. १६ ) रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळात हरिभक्त परायण आदिनाथ महाराज फपाळ यांच्या काल्याचे किर्तनाने तसेच महाप्रसाद वाटपाने श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याची सांगता हरिनाम गजरात होणार असल्याचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांनी सांगितले. या धार्मिक पर्वणीस सर्व भाविक, नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ॲड तापकीर यांनी केले आहे.