मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी अखेर आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. याप्रसंगी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना ठाकरे गटाचे आज (दि.१८) वरळीत शिबीर पार पडले. मात्र, त्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे ह्या नॉट रिचेबल झाल्या होत्या. त्या शिंदे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा चालू होती. अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटात रविवारी प्रवेश केला.
आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात अनेक प्रमुख महापालिकांची मुदत संपली आहे. येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायंदे यांचा शिंदे गटात प्रवेश उध्दव ठाकरेंना धक्का आहे.
शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यावेळी मनिषा कांयदे यांच्याकडे व्यक्त केली.
मुंबईतील चुनाभट्टी भागातील माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल, त्यांची पत्नी सान्वी तांडेल यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह चुनाभट्टी भागातील कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.