Sunday, May 19, 2024
Homeराज्यसावित्रीबाई फुले जयंती निमित्त एसएफआय ची 'लेखणी ज्योत' 

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त एसएफआय ची ‘लेखणी ज्योत’ 

शाळा वाचवण्याची सरकारकडे मागणी

पुणे : सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशी लेखणी ज्योत एसएफआय च्या वतीने काढण्यात आली. मोठया संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी यात सहभागी झाले होते.

ज्या भिडे वाड्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पाहिली शाळा चालू केली त्या भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याचा न्यायालयीन मार्ग मोकळा झाला. त्याचा आनंद व्यक्त करत लेखणी ज्योतची सुरुवात करण्यात आली. स्मारकासोबतच सर्वांना शिक्षण मिळून सावित्रीचे स्वप्न पूर्ण व्हावे. यासाठी शासनाकडे काही मागण्या करण्यात आल्या.

शासन दत्तक शाळा योजना आणून सर्वसामान्य विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकण्याचे षडयंत्र रचत आहे. ही योजना रद्द करून शासनाने शिक्षणावर खर्च करावा व शासनाने स्वतः शाळा चालावाव्यात. बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI च्या मार्फत संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिपसाठी देण्यात यावी. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती आणि डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना याची काटेकोर अंमलबजावणी करा. शिक्षणाचे बाजारीकरण व जातीव्यवस्थेला पूरक नवीन शिक्षण धोरण रद्द करा. अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शून्य रुपयात प्रवेश देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले. 

भिडेवाड्यापासून सुरू झालेल्या लेखणी ज्योतचे उद्घाटन फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. चंदनशिवे यांनी केले. जेधे कॉलेज, गरवारे कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज या ठिकाणी लेखणी ज्योतचे उत्स्फूर्त स्वागत फुलांच्या पाकळ्या टाकून विद्यार्थ्यांनी केले. रॅलीच्या मार्गात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभा घेण्यात आली. 

यावेळी ‘मी सावित्री बोलतेय’ या एकपात्री नाटकाचे सादरीकरण देवयानी फुले या विद्यार्थिनीने केले. जन आरोग्य मंचचे डॉ. सुधिर दैठणकर, एसएफआयचे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, जिल्हा सचिव नवनाथ मोरे यांनी विद्यार्थांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक शिंदे यांनी केले. तर प्रास्ताविक अक्षय निर्मळ आणि आभार प्रदर्शन अस्मिता थावरे यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय