कळवण (सुशिल कुवर) : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू नियंत्रणात येत असल्याने राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा येत्या १७ ऑगस्टपासून उघडणार आहे. कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून मंगळवारी यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते ७ वी आणि शहरी भागातील ८ वी ते इयत्ता १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मास्क, शारिरीक अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि शाळांचे निर्जंतुकीकरण करून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोरोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्तांना अधिकार दिले आहेत. राज्य सरकारने २ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या ‘ब्रेक द चेन’मधील सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत.
महापालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या समितीमध्ये प्रभाग अधिकारी, पालिकेचे वैद्यकीय अधिकार आणि शिक्षण अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
एका वर्गात जास्तीत जास्त २० विद्यार्थी बसतील कोरोना संबंधित नियमांचे काटेकोर पालन करून शाळा सुरु करण्यास परवानगी देताना जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दोन सत्रात भरतील. एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी असतील. दोन बाकांध्ये सहा फूट अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेतील उपस्थिती बंधनकारक राहणार नाही. पूर्णपणे पालकांच्या समंतीने विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकतात, असे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
ज्या शाळा सुरू होतील अशा संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो शाळेच्याच शहरात किंवा गावात करावी. शिक्षकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये, असे सूचनेत नमूद केले आहे.