बीड : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्याबद्दल अपशब्द वापरून महापुरूषांची बदनामी करणाऱ्या लोकसेवा अकॅडमीचे शिकवणी शिक्षक आप्पा हातनुरे याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निवेदन सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.
सदाशिव पेठ पुणे येथील लोकसेवा अकॅडमी चार शिकवणी शिक्षक आप्पा हातनुरे यांनी आपल्या युट्युबवर शिकवणी करताना क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या बद्दल अपशब्द वापरून महापुरूषांची बदनामी केली आहे. या घटनेचा सावता परिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. राज्यात ठिकठिकाणी सावता परिषदेने जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. या अकॅडमीवर बंदी घालुन त्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात महापुरूषांची बदनामी ही दुर्दैवाची बाब आहे. अशा माथेफिरू व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे. जेणेकरून कोणत्याच महापुरूषांची बदनामी होता कामा नये असे सावता परिषदेने म्हंटले आहे.
यावेळी सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते डॉ. राजीव काळे, परळी तालुका अध्यक्ष प्रशांत कोकाटे, तालुका सचिव आरसुळे शंभू, ता. उपाध्यक्ष अंकुश कोकाटे, संकेत कोकाटे, चेतन्य कोकाटे, विष्णू कोकाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.