Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडऋतुजा आणि योगेशचा सत्यशोधक विवाह आळंदी येथे संपन्न!

ऋतुजा आणि योगेशचा सत्यशोधक विवाह आळंदी येथे संपन्न!

आळंदी : ऋतुजा भुजबळ, पुणे आणि योगेश पाटील, सांगली यांचा आळंदी येथे सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला. सचिन थिटे यांनी जोडीदाराची विवेकी निवड प्रक्रियेतील पंचसूत्री आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका विशद केली. विशाल विमल यांनी कुठलाही पूजा पाठ न करता मित्रपरिवार व आप्तेष्ट यांच्या समक्ष, अनावश्यक रूढी परंपरांना फाटा देत सत्यशोधक विवाहाची माहिती दिली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमात परिचय झाला. परिचयाचे रूपांतर ओळखीत झाले आणि आता सहजीवनाची सुरुवात झाली आहे. या सहजीवनारंभ सोहळ्यासाठी ॲड.मनीषा महाजन, सचिन थिटे आणि विशाल विमल यांना निमंत्रण होतं. सुत्रसंचलन, सत्यशोधक विवाहाची भूमिका, शपथ देणं अशी पौरोहीत्याची जबाबदारीही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या तिन्ही कार्यकर्त्यांकडे होती.

कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा सत्यशोधक पद्धतीने आनंदात व उत्साहात झाला. उपस्थित पै पाहुण्यांना अशा वेगळ्या विवाह सोहळ्याचे कौतुक वाटतं होते. योगेश आणि ऋतुजाच्या कुटुंबियांना या विवाह निमित्ताने विशाल विमल आणि ॲड.मनीषा महाजन किमान 4 ते 5 वेळा भेटले होते. तेव्हाही छान वाटलं आणि लग्नात पाहून भारी वाटलं. अत्यंत सामंजस्य असलेले ऋतुजाचे आई-वडील कुटुंबीय आणि योगेशचे आई-वडील, काका नातेवाईक हे या माणूसपणाच्या वाटेवरून सहजीवनाच्या प्रवासाला निघालेल्या जोडीच्या सोबत आहेत, ही बाब खूप कौतुकाची वाटते.



पारंपरिक विवाह सोहळ्यातील रूढी परंपरा आणि खर्चाना फाटा देत, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक आदर्श असा कमी खर्चात, कुठलाही डाम-डौल, वाजंत्री, मानपान न करता साधेपणाने सत्यशोधकी विवाह – सहजीवनाआरंभ करणाऱ्या माणूसपणाच्या वाटेने निघालेल्या ऋतुजा, योगेश आणि त्यांच्या कुटुंबीय नातेवाईकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सचिन थिटे यांनी जोडीदाराची विवेकी निवड प्रक्रिया आणि त्या संदर्भातील पंचसूत्री याबद्दलची संपूर्ण माहिती दिली. विशाल विमल यांनी सत्यशोधक विवाह चळवळ जी महात्मा फुलेंनी सुरू केली होती त्याची माहिती दिली आणि कुठलाही पूजा पाठ कर्मकांड न करता आई वडील, मित्र, परिवार, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या साक्षीने लग्न करण्याचे महत्त्व सांगितले . ऍड.मनीषा महाजन म्हणाल्या की,देशातला पहिला सत्यशोधक विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांनी घडवून आणला. पुरोहितांशिवाय झालेल्या या विवाहात वराचे नाव सीताराम जबाजी आल्हाट तर वधूचं नाव राधा असं होतं. या लग्नाचा खर्च सावित्रीबाई फुले यांनी स्वतः केला होता. महात्मा फुले यांचा कर्मकांडाला विरोध असल्याने या विवाहामध्ये कर्मकांडाला फाटा दिला जातो. सप्तपदीऐवजी सत्य, प्रेम, विवेक, अहिंसा, श्रम, सदाचार आणि परिवर्तन या सात तत्वांना मानलं जातं.

या विवाह सोहळ्यास 30 वर्षांपूर्वी नोंदणी विवाह केलेले क्रांतिकुमार आणि शैलजा कडुलकर हे पुरोगामी चळवळीतील जोडपे उपस्थित होते. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नायडू हॉस्पिटलचे डॉक्टर सोनकांबळे उपस्थित होते.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय