Saturday, April 27, 2024
HomeNewsकर्मकांड व रूढी परंपरेला फाटा; आंतरधर्मीय ५० वा सत्यशोधकी विवाह उत्साहात

कर्मकांड व रूढी परंपरेला फाटा; आंतरधर्मीय ५० वा सत्यशोधकी विवाह उत्साहात

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्धा शाखेच्यावतीने धम्मदिप भागेश्वर मून रा.सेवाग्राम आणि प्रांजली मारोतराव कोडापे रा.करंजी भोगे या प्रेमीयुगुलांचा आंतरधर्मीय सत्यशोधकी विवाह सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून उत्साहात लावून देण्यात आला.

धम्मदिप हा दहावी नंतर आय.टी.आय करत असून व प्रांजली महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. या दोघांचीही आधी सहज ओळख झाली. नंतर वेळोवेळी भेटी होत राहिल्या. एकमेकांचे आकर्षण निर्माण झाले. यातूनच दोघांत प्रेमाची पालवी फुटू लागली. भेटी वाढ.ल्या ही बाब प्रांजलीच्या घरी कळली. घरून विरोध होऊ लागला. मात्र एकमेकांवर जिवापाड प्रेम करणा-या या दोघांनीही विरोध पत्करून विवाह करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पण हे कसे साध्य होणार ही चिंता त्यांना त्रस्त करीत होती. यातच सेवाग्राम येथे राहणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विलास कांबळे यांच्याशी संपर्क झाला. त्यांच्याजवळ विवाहाबद्ल प्रस्ताव ठेवला. त्यांनी लगेच समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांना कळविले.

आंतरधर्मीय विवाहाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुटुंबाची प्रतिष्ठा, जात व धर्माचे समाजातील ठेकेदार, लव्ह जिहादच्या नावाखाली अशा प्रेमीयुगुलांची हत्या करणारे अथवा मारहाण करणारे गुंड प्रवृत्तीचे लोक यांच्याकडून होणारा धोका लक्षात घेऊन धम्मदिप व प्रांजली या दोघांनाही वर्धेला बोलावून घेतले. सर्व प्रकारे चौकशी करून दोघांचेही समुपदेशन केले व लगेच दुसरेच दिवशी धम्मदिप याच्या राहत्या घरी गांवक-यांच्या व कुटूंबातील सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत कायदेशीर बाबी पूर्ण करून उत्साहात विवाह पार पडला.

कोणत्याही प्रकारचे कर्मकांड, रूढी परंपरा यांना फाटा देत या सत्यशोधकी विवाहाचे सोपस्कार युवा विभागाचे प्रमुख प्रितेश म्हैसकर सहकार्यवाह निखिल जवादे, कार्यकर्ता रूपेश वैद्य यांनी पार पाडली. या सत्यशोधकी विवाहाचे स्वरूप,त्यामागिल कारणे,समितीचा उदे्श सुनिल ढाले यांनी सांगितला. तर सर्व कायदेशीर बाबी गजेंद्र सुरकार यांनी दोघांकडून पूर्ण करून घेतल्या. धम्मदिप व प्रांजली यांनी जात व धर्माला नाकारून दोघांनीही मानव म्हणून एकमेकांना स्वीकारले. समितीच्यावतीने दोघांनाही अभिनंदनपत्र देवून सर्वांसमक्ष सत्कार करण्यात आला. विदर्भात सामंजस्याने विवाह लावून देणारी आमची एकमेव शाखा असून हा ५० वा विवाह असल्याचे सूरकार म्हणाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय