Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड"पर्यावरण ऱ्हासासाठी श्रीमंत देश जबाबदार!" मधुश्री व्याख्यानमालेत डॉ.सुरेश बेरी यांचे प्रतिपादन

“पर्यावरण ऱ्हासासाठी श्रीमंत देश जबाबदार!” मधुश्री व्याख्यानमालेत डॉ.सुरेश बेरी यांचे प्रतिपादन

पिंपरी चिंचवड : दि.२६ – “पर्यावरण ऱ्हासासाठी अमेरिकेसारखे श्रीमंत देश जबाबदार आहेत!” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.सुरेश बेरी यांनी कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे गुरुवार, दिनांक २५ मे २०२३ रोजी केले. मधुश्री कला आविष्कार आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘पर्यावरण’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना डॉ.सुरेश बेरी बोलत होते. माजी महापौर आर. एस. कुमार अध्यक्षस्थानी होते; तसेच मधुश्री कला आविष्कारच्या अध्यक्ष माधुरी ओक, सचिव राजेंद्र बाबर, डॉ.शुभांगी म्हेत्रे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती, त्याचप्रमाणे विविध सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थांचे बहुसंख्य पदाधिकारी सभागृहात उपस्थित होते.

डॉ. सुरेश बेरी पुढे म्हणाले की, “पर्यावरण हा आपल्याकडे खूप दुर्लक्षित विषय आहे. पर्यावरणाचे जागतिक आणि स्थानिक असे दोन भाग आहेत. जागतिक पर्यावरणाचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर करणे अपेक्षित आहे. निसर्ग आणि सजीव सृष्टी यांचा योग्य समन्वय पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक आहे.‌ जर हा समतोल बिघडला तर अनेक आपत्ती उद्भवतात. ग्लोबल वॉर्मिंग अर्थात पृथ्वीची तापमानवाढ हे पर्यावरणाचे संतुलन ढासळण्याचे प्रमुख कारण आहे. हरितगृहांतील विविध वायू वातावरणात मिसळून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. तसेच वेगवेगळ्या इंधनांचे ज्वलन, बेसुमार वृक्षतोड यामुळे तापमानवाढ होते.‌ तापमानवाढीमुळे अतिवृष्टी, महापूर, वादळे, हवामान बदल अशा नैसर्गिक आपत्तींची वारंवारता वाढली आहे. त्यामुळे दुष्काळ, अन्नधान्य तुटवडा, जीवनशैलीतील बदल, रोगांचा प्रादुर्भाव, खंडित जैवसाखळी, मानवी स्थलांतर अशा अनिष्ट गोष्टी घडतात. अर्थात त्याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो; याशिवाय अपमृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. कार्बन उत्सर्जनामुळे वातावरणातील ओझोन वायूच्या थराला भगदाड पडून सूर्याचे अतिनील किरणे थेट पृथ्वीवर पडत असल्याने कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. पर्यावरणाची हानी वेळीच रोखली नाहीतर सजीव सृष्टीचा विनाश होईल, असे संकेत वैज्ञानिक आणि अभ्यासक यांनी दिले आहेत.



या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर वीसहून अधिक वेळा पर्यावरण परिषदांचे आयोजन करण्यात आलेले आहे.‌ कार्बन उत्सर्जन आणि पर्यावरणाची हानी करण्यात अमेरिका, चीन यांसारख्या बलाढ्य आणि श्रीमंत राष्ट्रांची मुजोरी कारणीभूत ठरते आहे. वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग, ग्रेटा थनबर्गसारखी शाळकरी मुलगी आणि पर्यावरणप्रेमी यांचे पर्यावरण जागृतीचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. आपल्या देशातील तरुणाईने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे!” असे आवाहन डॉ. सुरेश बेरी यांनी केले.

डॉ. गीता आफळे यांनी, “आपल्या संस्कृतीतील सणवार हे पर्यावरणपूरक आहेत. प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी खारीचा वाटा उचलावा!” असे आवाहन केले. आर. एस. कुमार यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “पर्यावरणाविषयी खूप बोलले अन् लिहिले जाते; पण बेपर्वाई कमी होत नाही!” अशी खंत व्यक्त केली. माधुरी ओक यांनी प्रास्ताविकातून मधुश्री कला आविष्कारच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

याप्रसंगी प्रा. तुकाराम पाटील, शरद काणेकर, प्रदीप गांधलीकर यांचा सत्कार करण्यात आला. अरुण थोरात, राज अहेरराव, अश्विनी कुलकर्णी, सलीम शिकलगार, अजित देशपांडे, रमेश वाकनीस, सुनील देशपांडे, विनायक गुहे, राधिका बोर्लीकर, नंदकुमार मुरडे यांनी संयोजनात सहकार्य केले. रेणुका हजारे यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला केळकर यांनी आभार मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय