Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडवटपौर्णिमेला झाडाला बांधलेले दोरे काढणे ते... वडाचे झाड लावणे

वटपौर्णिमेला झाडाला बांधलेले दोरे काढणे ते… वडाचे झाड लावणे

दिलासा संस्था अन् मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचा सामाजिक उपक्रम.

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर
: नवी सांगवी – दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे सक्रिय कार्यकर्ते मुरलीधर दळवी यांनी सामाजिक बांधिलकी जपत नवी सांगवी येथील शनी मारुती मंदीरा समोरील वटवृक्षाचे वटपौर्णिमा निमित्त महिलांनी पूजन केलेले दोरे, कापूस, फुले तसेच इतर पूजेचे साहित्य यातून वडाच्या झाडाला मोकळे केले. वसंत यादव, संदीप काकडे अन् पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सफाई कामगार महिला यांच्या मदतीने परिसर स्वच्छ केला.



मुरलीधर दळवी या उपक्रमाबाबत म्हणाले ,टेलिव्हिजनवरील बातम्या पहात असताना कोल्हापूर येथील वडाच्या झाडाला वटपौर्णिमेच्या दिवशी आग लागल्याची बातमी पाहिली. मन अस्वस्थ झाले. आपल्या परिसरातील वडाची झाडे मोकळी करावी असा निश्चय केला. सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना सोबत घेऊन झाडाचा परिसर साफ करून सर्व निर्माल्य पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचरा गाडीत टाकले. वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नी सुनिता दळवी अन् माझी मुलगी पुनम अंबिके यांनी वडाच्या झाडाचे रोप वृक्ष वाटिकेतून आणले होते.



त्या वृक्षाचे मनोभावे पूजन मुलीने अन् पत्नीने केले होते. वडाच्या झाडाचे हे रोपटे कुठेतरी लावले पाहिजे असा विचार मनात आल्यावर मी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक आणि मानवी हक्क आणि संरक्षण जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांना सोबत घेऊन पिंपळे गुरव स्मशानभूमी जवळील नदीकिनारी वडाच्या या रोपाचे वृक्षारोपण केले. पाणी घातले. आता हेच झाड वर्षभर देखरेख करून आम्ही जगवणार आहोत. समाजातील सर्व माणसांनी याप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. त्यातून छोटेसे सत्कार्य केल्याची अनुभूती मिळते. कुणीतरी करेल यापेक्षा यापुढे तरुणाईने अशा कामात पुढाकार घ्यायला हवा असे विचार सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर दळवी यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय