सोलापूर : कामगारांनी सव्वाशे वर्षात संघर्ष करून मिळवलेले कामगारांचे सर्व हक्क आणि कायदे नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर चार श्रमसंहितांच्या नावाखाली रद्द केले. भारतीय कामगार वर्गाच्या इतिहासातील हा सर्वात गंभीर हल्ला आहे. येत्या निवडणुकीत हे कामगारविरोधी सरकार पुन्हा निवडून आले तर भविष्यातील दिवस सर्वच कामगार-कर्मचा-यांसाठी अत्यंत बिकट होतील. मोदी नीतीच्या ह्या काळात बेरोजगारी आणि महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला अंबानी, अदानी यांसारख्या मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांच्या संपत्तीत दरवर्षी लाखो कोटी रुपयांची वाढ होत आहे. आज आपल्या तरुणांना स्थिर आणि चांगले रोजगार उपलब्ध नाही. बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच सरकार विरोधी व्यक्त झाल्यास त्यांची रवानगी थेट तुरुंगात हि कुटनीती मोदी सरकारची आहे. हे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास आपल्या सारख्या सर्वसामान्यांचा आवाज कायमचा दबला जाईल आणि देशामध्ये हुकुमशाहीची पाळेमुळे रुजतील म्हणून शेतकरी-कामगार-सर्वसामान्य जनता व देश विरोधी मोदी नीती हटाव, भारत देश बचावचा यल्गार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या आक्रमक धरणे आंदोलनात पुकारला.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने २७ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी महापाडाव ची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने सोलापूर येथे सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे आक्रमक धरणे आंदोलन पार पडले.
यावेळी प्रास्ताविकात कॉ. एम.एच.शेख म्हणाले कि, शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या आऊटसोर्सिंग धोरणामुळे किंवा केंद्र सरकारच्या अग्निपथसारख्या योजनांच्या माध्यमातून उपलब्ध होणारा नवीन रोजगार हा तात्पुरता, कंत्राटी किंवा नैमित्तिक म्हणजेच वापरा आणि फेकून या अशा प्रकारचा असणार आहे. खाजगी क्षेत्रातही हीच परिस्थिती आहे. बहुसंख्य तरुणांच्या भविष्यात अंधःकारच असणार आहे हे स्पष्ट दिसते आहे.
मोदी सरकार बीएसएनएल टॉवर नेटवर्क, रेल्वे मार्ग, रेल्वे स्थानके आणि रेल्वे, संपूर्ण कोकण रेल्वे, कोळसा खाणी, गॅस आणि तेल पाईपलाईन, सरकारी अन्नधान्याची गोदामे, २५ विमानतळे, मऊ मोठी बंदरे, हजारो किलोमीटरचे रस्ते, वीज पारेषण वाहिन्या, सरकारी जमीनी आणि इमारतींची प्रचंड संपत्ती, देशाची सार्वजनिक मालमत्ता अदानी आणि अंबानी यांसारख्या कॉर्पोरेट मित्रांच्या गुजरातमध्ये मुख्यालय असणान्या मोठ्या कॉर्पोरेशन्सला आंदण देत आहे. हेच मोदी नीतीच विकासाचे गुजरात मॉडेल आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्लांट, बोईंगचा एअरक्राफ्ट प्लांट आदी महत्वाचे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजारातला हलविण्यात आले.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणि विमा क्षेत्राला मोदींच्या कॉर्परिट मित्रांना निधी पुरवण्यास भाग पाडले जात आहे. मोदी आपल्या कॉर्पोरेट मित्रांची समृध्दी वाढवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि अगदी रिझर्व्ह बँकेलाही दिवाळखोरीच्या खाईत ढकलत आहेत. मोदींच्या नोटबंदी आणि जीएसटीच्या धोरणांमुळे छोटे व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि उत्पादक यांचे कंबरडे मोडले आहे. ते अडचणीत सापडले आहेत. याचा फायदा अॅमेझॉन, जिओ, गुगल आणि वॉलमार्टसारख्या बड्या ऑनलाईन कंपन्यांना होत आहे आणि होणार आहे.
मोदी नीतीने पुढे आणलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ने सर्वांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्कावरच घाला घातला आहे. सरकारी शाळा-महाविद्यालयांची जागा सर्वसामन्यांना न परवडणाऱ्या खासगी शाळा-महाविद्यालये घेत आहेत. सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. डिजिटल कॉपोरेशन्स आणि ऑनलाईन शिक्षण ह्यावर नियंत्रण आणि वर्चस्व असेलेली कॉर्पोरट-आरएसएसची युती शिक्षण व्यवस्थेवरच ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.
न्यूजक्लिकसारखे न्यूज पोर्टल कामगारांचे आणि शेतकन्यांचे प्रश्न आणि सत्य माहिती सर्वसामान्य जनतेपुढे मांडून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात, कोळसा आयातीसारख्या घोटाळ्यात गुंतलेल्या लुटारू कॉपेरिटस्चा पर्दाफाश करतात, तेंव्हा अशा महाघोटाळ्यांची चौकशी करण्याऐवजी लुटास कार्पोरेटस्नां संरक्षण देण्यासाठी मोदी सरकार ईडी, सीबीआय, एनआयए आणि आयटीसारख्या यंत्रणांचा आणि यूएपीएसारख्या कठोर कायद्यांचा गैरवापर करून प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज बंद करण्याचा, लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे.
यावेळी व्यासपीठावर नलिनी कलबुर्गी, मुरलीधर सुंचू, सिद्धप्पा कलशेट्टी, शेवंता देशमुख, डी.रमेश बाबू, व्यंकटेश कोंगारी, शकुंतला पानिभाते, रंगप्पा मरेड्डी, ॲड.अनिल वासम आदींची उपस्थिती होती. यावेळी नसीमा शेख, युसुफ मेजर आदींनी सभेला संबोधित केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड.अनिल वासम यांनी केले. यावेळी हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सलीम मुल्ला, विल्यम ससाणे, दाऊद शेख, नरेश दुगाने, जावेद सगरी, बापू साबळे, विक्रम कलबुर्गी, अप्पाशा चांगले, हुसेन शेख राजेश काशीद, असलं शेख, प्रशांत चौगुले, हरीश पवार, फिरोज शेख, अमीन शेख, युसुफ कालू सिद्राम गायकवाड, नितीन गुंजे, संदीप धोत्रे, बजरंग गायकवाड, नितीन कोळेकर, गंगाराम निंबाळकर, राजू गेंटयाल, बालाजी तुम्मा, अंबादास बिंगी, विजय मरेड्डी, वीरेंद्र पद्मा, बालाजी गुंडे, बाळकृष्ण मल्याल, प्रवीण आडम, विजय हरसुरे, रफिक काझी, वासिम देशमुख, नरेश गुल्लापल्ली, दिनेश बडगु, प्रभाकर गेंटयाल, रवींद्र गेंटयाल, अकिल शेख, असिफ पठाण, इलियास सिद्धिकी, दीपक निकंबे, सनी शेट्टी, शाम आडम , दत्ता चव्हाण, अभिजित निकंबे, सनी आमटी, मल्लिकार्जुन बेलीयार, प्रकाश कुऱ्हाडकर, युसुफ शेख, संजय ओमकार, शिवा श्रीराम,आदींनी परिश्रम घेतले.