Sunday, May 12, 2024
Homeजिल्हाराजर्षी शाहूंचे कार्य समाजासाठी आजही दिशादर्शक - प्राचार्य डॉ.आय.एच. पठाण

राजर्षी शाहूंचे कार्य समाजासाठी आजही दिशादर्शक – प्राचार्य डॉ.आय.एच. पठाण

कागल : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त इतिहास विभागाच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्ष निमित्ताने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त इतिहास मंडळ व इतिहास विभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ.आय. एच. पठाण यांचे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज : जीवन व कार्य याविषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.आय.एच. पठाण म्हणाले, छत्रपती शाहू महाराज हे दूरदृष्टीचे राजे होते. त्यांनी आपल्या संस्थानातील अस्पृश्य लोकांना न्याय दिला. गंगाराम कांबळे यांना चहाची टपरी उघडण्यास सहाय्य केले. महाराज तिथे थांबून त्यांच्या हातचा चहा पित व इतरांनाही चहा पिण्यास भाग पाडत असत. त्यांनी आपल्या कृतीतून अस्पृश्य वगैरे काही नसते हे दाखवून दिले. असा हा थोर मनाचा राजा होता. डॉ पठाण यांनी  शाहु महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग उदाहरण देऊन सांगितले. याचबरोबर महाराजांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक, आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. 

महाराज हे कृतीशील राजे होते. अस्पृश्यांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वतोवरी प्रयत्न केले. महाराजांनी त्यांना सूर्यवंशी नावाने संबोधले. त्यांची आडनावे बदलून शिर्के, भोसले व शिंदे अशी ठेवली. महाराजांनी स्त्री शिक्षणासाठी ही प्रयत्न केले. त्यांनी कृष्णाबाई केळकर यांना कोल्हापूर संस्थानाच्या शिक्षणअधिकारी बनविले. महाराजांनी फासी पारध्यांच्या हाताला काम दिले. त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर केले एकंदर समाजात सामाजिक समता घडवून आण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी स्वातंत्र्य चळवळीला मोठा हातभार लावला. महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीही व्यसन केले नाही हा आदर्श आजच्या तरुणांनी घेतला पाहिजे. राजर्षी शाहूंचे कार्य समाजासाठी आजही दिशादर्शक आहे, असे डॉ. पठाण यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, शाहू महाराजांनी आपले संबंध आयुष्य आपल्या संस्थानांतील रंजले गांजलेल्या लोकांच्या कल्याणासाठी वेचले. आपल्या संस्थानातील कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, असे ते म्हणाले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष जेठिथोर यांनी केली. कार्यक्रमाचे आभार प्रा. संदिप वाडीकर यांनी मानले. तर सुत्रसंचालन प्रा. कल्पना गुरव यांनी केले. यावेळी IQAC प्रमुख प्रा. डॉ. आदिनाथ गाडे, प्रा. आबासाहेब चौगले, डॉ. बी. के. स्वामी, प्रा. शिरदवाडे प्रा. निशांत खाबडे व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय