धनकवडी : “माझा प्रभाग, सुरक्षित प्रभाग” या संकल्पनेतून नगरसेवक महेश वाबळे यांनी विकास निधीतून सीसीटीव्ही यंत्रणेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. ऋतुरंग सोसायटी, संपूर्ण वाळवेकर परिसर आणि आण्णा भाऊ साठे वसाहत या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले. आता प्रभागात सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे.
शहरामध्ये सोनसाखळ्या हिसकविण्याचे प्रकार दररोज घडत आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून सोसायट्याच्या आवारातही सोनसाखळ्यांची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. घटफोडया किंवा सोनसाखळी हिसकाविण्याच्या घटना झालेल्या बहुतांश सोसायटीच्या आवारात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे या घटनांतील आरोपी शोधण्यात पोलिसांना अडचणी निर्माण झाल्या. चोरटयाकडून सुद्धा जाणीवपूर्वक अशाच प्रकारच्या सोसायटया निवडल्या जात असल्याचे यावरून अधोरेखित होते. म्हणूनच माझा प्रभाग, सुरक्षित प्रभाग, या उपक्रमाअंतर्गत सीसीटीव्ही बसविले जात आहेत. हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे मत सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभीरे यांनी व्यक्त केले. ते सीसीटीव्ही यंत्रणेच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
साखळी चोऱ्या, घरफोड्या, वाहन चोरांवर अंकुश ठेवण्यासह परिसराची सुरक्षितता राखणे, चोरट्यांना व गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांना पकडणे पोलिसांना सहज शक्य व्हावे या उद्देशाने “माझा प्रभाग, सुरक्षित प्रभाग” या उपक्रमाअंतर्गत प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा संकल्प नगरसेवक महेश वाबळे यांनी केला होता.
यावेळी बोलताना नगरसेवक महेश वाबळे म्हणाले, सहकारनगर परिसरात बंगलो सोसायट्यांची संख्या जास्त आहे. हा परिसर अत्यंत निसर्गसंपन्न आणि शांत आहे. अंतर्गत रस्तांवर रहदारी नसल्यामुळे निर्मनुष्य परिसराचा फायदा घेऊन सोनसाखळ्या हिसकविण्याचे प्रकार तसेच अनोळखी व्यक्तींच्या घुसखोरीमुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलींसाठी असुरक्षित वातावरण व रहिवाशांना त्रासदायक ठरणाऱ्या घटना या सर्वांगिण बाबींचा विचार करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला.
यावेळी शिळेश देशपांडे, सारिका ठाकर, हरिष परदेशी, मंगेश शहाणे, गणेश लगस, भानुदास ढोबले, मालती अवघडे, संगीता चौरे, मंजू डांगी, संध्या नांदे, प्रशांत थोपटे, अशोक ओम्बासे उपस्थित होते.