जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नरमधील गणपती उत्सव संदर्भात सोमवार (दि.२९) रोजी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत जुन्नर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून कालिकामाता मंदिर सभागृह, सदाबाजार पेठ जुन्नर येथे प्रशासकीय आढावा बैठक आयोजित केली होती.
या बैठकीस आमदार अतुल बेनके, तहसीलदार रवींद्र सबनीस, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक विकास जाधव, मुख्याधिकारी मनोज पष्टे, सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, महा. विद्युत वितरणाचे उपअभियंता आनंद घुले, माजी नगराध्यक्ष शाम पांडे, माजी उपनगराध्यक्षा अलका फुलपगार, माजी नगरसेवक मधुकर काजळे, अविनाश करडीले तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते व मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जुन्नर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करावा तसेच गणेश मंडळांच्या असलेल्या मागण्या व सूचना आदी विषयांबाबत यावेळी मनोगते घेण्यात आली. याप्रसंगी पोलीस पाटील संघटना तसेच उत्कृष्ट मंडळांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला.
या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख मार्गदर्शन करताना म्हणाले, कोरोनामुळे अनेक संकटांवर मात करीत आपण हा गणेशोत्सव साजरा करणार आहोत. गेली २ वर्षे आपल्यावर असलेल्या निर्बंधांमुळे उत्सवाचा हिरमोड व्हायचा पण हे नाईलाजाने करावे लागायचे. यापूर्वी जसे शांतता व संयम राखून सण उत्साहाने साजरे केले तसेच याही वेळी सामाजिक एकोपा ठेवून, धार्मिक तेढ निर्माण होऊ न देता, मांगल्याचे पावित्र्य जपत चांगले वातावरण ठेवावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी तर आभार पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील यांनी केले.