नवी दिल्ली : शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एका शिक्षिकेचा समावेश आहे. मृणाल गांजाळे असे या शिक्षिकेचे नाव आहे.
पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पिंपळगाव महाळुंगे येथील उपक्रमशील शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांना २०२३ या वर्षाचा शालेय विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (National Teachers’ Award 2023) प्रदान करण्यात आला. भारतातून 50 शिक्षकांची तर महाराष्ट्रातून एका शिक्षिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना यापूर्वी २०१९ मधील राष्ट्रीय आय.सी.टी. पुरस्कार व २०२२ मधील राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
श्रीमती मृणाल गांजाळे- शिंदे यांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापर जगभरातील विद्यार्थ्यांना व्हर्चुअल प्रकारे शिक्षणाचे आदान-प्रदान, गेमी फिकेशन इन एज्युकेशन प्रकल्प, असे वेगवेगळे तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग केले. ऑनलाइन शिक्षण, इतर देशातील शाळांशी थेट विद्यार्थ्यांचा संवाद, वेबसाइट मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर, राज्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण, कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन अत्याधुनिक शिक्षण दिले.
श्रीमती मृणाल गांजाळे यांचे सन २०१९-२०२० या वर्षात इयत्ता पाचवीमध्ये शिष्यवृत्तीधारक १७ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थी नवोदय २ विद्यालयासाठी निवड पात्र ठरले. प्रधानमंत्री विद्या वाहिनीवर शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर सत्रात CIET-NCERT मार्फत तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले मागील वर्षी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी देखील दिल्ली येथे त्यांच्या शैक्षणिक कामाचे कौतुक करून सन्मान केला. राष्ट्रीय आय.सी.टी मेला मध्ये देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे.