पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यात रविवारपासून थंडीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. रविवारी 13 अंश सेल्सिअसवर असलेले किमान तापमान अवघ्या काही तासांतच 8.6 अंश सेल्सिअस एवढे खाली घसरले.
एरवी जास्त थंड असलेल्या महाबळेश्वरपेक्षा सोमवारी पुणे जास्त थंड होते. शहर व जिल्ह्यात काही तासांत पाच अंश सेल्सिअसने किमान तापमानात घट झाल्यामुळे थंडीत अचानक वाढ झाली आहे. ही कडाक्याची थंडी असून, सर्वच भागात अखेर शेकोट्या पेटल्या तसेच नागरिकही उबदार कपडे घालून घराबाहेर पडले असल्याचे दिसून आले.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्याच्या सर्वच भागात मागील आठवड्यापासून ते अगदी शनिवार रविवारपर्यंत किमान तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. तर कमाल तापमान 30 ते 33 अंशांवर पोहचले होते. अगदी रविवारी देखील शहराचे किमान तापमान 13. 4 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. मात्र, रविवारी रात्री अचानक त्यामध्ये घट होऊन ते 8.6 अंश सेल्सिअस एवढे खाली घसरले.
अवघ्या काही तासातच किमान तापमानात 5 हून अधिक अंश सेल्सिअसने घट झाली, त्यामुळे शहरात रविवारी मध्यरात्रीपासून जोरदार थंडी वाढली. सोमवारी दिवसभर शहरात चांगले ऊन पडलेले असूनदेखील चांगलाच गारवा जाणवत होता.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन भागात पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढलेला आहे.त्यामुळे उत्तर भारतात शीतलहर आली आहे. या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे शहर व परिसरात थंडी वाढली. शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात आठवडाभर थंडीचा कडाका जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना उबदार कपडे घालूनच बाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.