नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याच्या प्रयत्नाचा भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या पॉलिट ब्युरोने निषेध व्यक्त केला. यासंदर्भातील प्रसिध्दी पत्रक माकपने जारी केले आहे.
माकप च्या पॉलिट ब्युरोने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शिवसेनेच्या काही आमदारांना ज्या पद्धतीने आधी सुरत आणि नंतर गुवाहाटी या दोन्ही भाजप शासित राज्यांमधील शहरांमध्ये नेण्यात आले, त्या घटनेचा भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चा पॉलिट ब्युरो तीव्र निषेध करीत आहे. हे काम या दोन्ही भाजप-शासित राज्यातील शासकीय यंत्रणांचा वापर करूनच केले गेले आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील संस्थांचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी, महाविकास आघाडीच्या मंत्री आणि आमदारांना देखील लक्ष्य केले जात आहे.
अशा प्रकारे निर्लज्जपणे शासन यंत्रणेचा वापर करणे नवीन नाही, तर ती विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यातील सरकारे पाडण्यासाठी सातत्याने होत असलेल्या घटनाक्रमातील अजून एक पुढची घटना आहे, अशी ही टिका माकपने केली आहे.
तसेच लोकशाहीवादी घटकांना माकपने आवाहन केले आहे की, त्यांनी लोकशाहीला सुरुंग लावण्यासाठी केल्या गेलेल्या शासन यंत्रणेच्या गैरवापराच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी पुढे यावे.