Thursday, November 21, 2024
Homeआंतरराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना तीन रेल्वे प्रकल्पांचे संयुक्तपणे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना तीन रेल्वे प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्घाटन केले

नवी दिल्‍ली, (दि.01) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते संयुक्तपणे सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भारतातर्फे सहाय्यीकृत तीन रेल्वे विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. अखौरा-आगरताळा सीमापार रेल्वे जोडणी, खुलना-मोंगला बंदर रेल्वे मार्ग; आणि मैत्री महा औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे युनिट-2 हे ते तीन प्रकल्प आहेत.

अखौरा-आगरताळा सीमापार रेल्वे जोडणी प्रकल्पाच्या कामासाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारला 392.52 कोटी रुपयांचे मदत अनुदान दिले आहे. या रेल्वे जोडणी भागाची लांबी 12.24 किलोमीटर आहे आणि त्यापैकी 6.78 किलोमीटरचा दुहेरी गेज रेल्वे टप्पा बांगलादेशच्या क्षेत्रामध्ये असून 5.46 किलोमीटर लांबीचा रेल्वेचा टप्पा त्रिपुरामध्ये आहे.

खुलना-मोंगला बंदर रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामाची अंमलबजावणी भारत सरकारच्या कर्ज अनुदानातून झाली असून या प्रकल्पाचा एकूण खर्च 388.92 दशलक्ष डॉलर्स आहे. या प्रकल्पातून मोंगला बंदर आणि खुलना येथील विद्यमान रेल्वे नेटवर्क यांच्या दरम्यानच्या सुमारे 65 किलोमीटर लांबीचा ब्रॉडगेज रेल्वे मार्गाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे, बांगलादेशमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे बंदर असणारे मोंगला हे बंदर ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या नेटवर्कशी जोडले गेले आहे.

मैत्री महा औष्णिक ऊर्जा प्रकल्प युनिट-2 हा प्रकल्प भारतीय सवलतीतील वित्तपुरवठा योजनेतून 1.6 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेऊन उभारण्यात आला आहे. सुमारे 1320 मेगावॉट (2×660) क्षमतेचा हा महा औष्णिक ऊर्जा प्रकल्प (एमएसटीपीपी) बांगलादेशच्या खुलना विभागात रामपाल येथे उभारण्यात आला आहे.भारतातील एनटीपीसी आणि बांगलादेश ऊर्जा विकास मंडळ (बीपीडीबी) या दोन्हींचा प्रत्येकी 50% भाग असलेली बांगलादेश-भारत मैत्री ऊर्जा कंपनी या संयुक्त उपक्रमाने सदर प्रकल्पाच्या उभारणीचे काम केले आहे. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी सप्टेंबर 2022 मध्ये मैत्री महा औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या युनिट क्र. 1 चे उद्घाटन केले होते आणि आता या प्रकल्पाच्या युनिट 2 चे उद्घाटन उद्या, 1 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. 

मैत्री महा औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून ऊर्जा निर्मितीचे कार्य सुरु झाल्यामुळे बांगलादेशच्या ऊर्जा सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. या तीन प्रकल्पांमुळे त्या भागातील दळणवळण आणि ऊर्जा सुरक्षितता आणखी बळकट होणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय