Saturday, April 27, 2024
Homeविशेष लेखसापेक्षता सांगणारा माणूस

सापेक्षता सांगणारा माणूस

भारत ज्ञान-विज्ञान समुदाय ही संस्था वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये जावा म्हणून सातत्याने प्रयत्न करीत आली आहे. व्याख्याने, चित्र-प्रदर्शन, परिसंवाद, पथनाट्य, प्रात्यक्षिके… असे अनेक प्रकारचे उपक्रम संस्था आयोजित करते. एवढ्यातच, राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने, संस्थेने एक नाट्यप्रयोग घडवून आणला. ‘सापेक्षता सांगणारा माणूस’. आइन्स्टाईन व्यक्ती आणि कार्य असा नाट्यप्रयोगाचा साधारणपणे अर्थ आणि आशय होता, हे ओघाने आलेच. कोल्हापूरच्या प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्राने तो प्रयोग सादर केला आणि प्रयोगाचे दिग्दर्शन केले होते, डॉ. शरद भुथाडिया यांनी.

‘ऑस्कर’चा दरवाजा ठोठावणारा दीपा मेहता यांचा ‘वॉटर’ हा चित्रपट काय किंवा राहुल ढोलकिया यांनी दिग्दर्शन केलेला, गुजरातमधील दंग्याचा संदर्भ घेऊन आलेला, परझानिया चित्रपट काय, त्यामधील सत्याचा प्रकाश ज्यांना सहन झाला नाही त्यांनी त्या चित्रपटांचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. ‘न ब्रूयात् ससत्यमप्रियम्’ अप्रिय ठरणारे सत्य बोलू नका असे तुम्हाआम्हाला बजावून सांगणारा हा काळ. भल्याभल्यांनी गुळणी धरलेली आपल्याला पहावी लागते, तो हा काळ. अशा विपरीत काळामध्ये, सत्याची कास धरण्याचे आवाहन ज्ञान-विज्ञान समुदाय संस्था करीत राहते आणि प्रत्यय संस्थाही त्या मार्गावर आइन्स्टाईनच्या जीवनप्रवासामधील नाट्य सादरीकरणासाठी निवडते, या घटनेला विशेष अर्थ आहे.

“सापेक्षता सांगणारा माणूस’ हा गॅब्रियल इमॅन्युएल यांच्या लेखनाचा, शरद नावरे यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. नाट्यप्रयोगाचा रोख अर्थातच सापेक्षता सांगणाऱ्या आइन्स्टाईन या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाकडे नसून, आइन्स्टाईनमधील माणसाकडे आहे. स्वतः आइन्स्टाईन त्याच्या अभ्यासिकेत आहे आणि तिथून तो एकाच वेळी तुमच्या-आमच्याशी आणि स्वतःशी बोलत आहे, अशी लेखकाने कल्पना केली आहे. इथे आइन्स्टाईन आपल्याशी बोलतो ते त्याच्या आईबाबांबद्दल, त्याचे शाळेतले शिक्षक त्याला आठवतात; मित्रांबद्दल, सहकाऱ्याबद्दल त्याला काही सांगायचे आहे; चाली चॅप्लिन, बेल्जियमची राणी, इस्त्राएलचे पंतप्रधान अशा थोरामोठ्यांच्या हकिगती त्याच्या बोलण्यात सहज येतात; ज्यू असल्यामुळे उद्‌भवलेले प्रसंगही तो सांगून टाकतो; त्याच्या बायकोबद्दलच्या- मिलेव्हाबद्दलच्या भावना आपल्याला कळतात….

आणि अर्थातच सापेक्षतावादावा सिद्धांत शक्य तितक्या सोप्या रीतीने सांगण्याचा तो प्रयत्न करतो. सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताची खिल्ली उडविणाऱ्यांना अर्थातच तो विसरत नाही. अवकाश आणि काल यामध्ये पुढे-मागे सोयीनुसार करीत, आंदोलने घेत असल्यासारखे त्याचे बोलणे सुरू राहते. ‘आधी’ आणि ‘नंतर’ असा काहीसा अस्फुटसा चकवा त्याच्या अखंड बोलण्यामध्ये जाणवत राहतो. आइन्स्टाईनच्या कहाणीला एक लालित्य लाभले आहे, हे त्या निवेदनाच्या सैलसर वीणीमुळे, असे म्हणता येईल. ते लालित्य लाभते, त्याला आणखीही एक कारण आहे, असे दिसते. छोट्यांच्या मोठ्या गोष्टी आणि मोठ्यांच्या छोट्या गोष्टी असे, आपण म्हणतो., अशा अनेक हकिगती आइन्स्टाइनकडून आपल्याला ऐकायला मिळतात. हकिगतीमधील व्यक्तिगत संदर्भ अतिशय हृद्य आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, या निवेदनामध्ये ठायी ठायी अनुभवाला येणारी आइन्स्टाईनची विनोदबुद्धी!

प्रकट चिंतन

पुढे-मागे करीत आठवणींना उजाळा देताना, आइन्स्टाईनला क्षणभर थांबून प्रकट चिंतन करावेसे वाटते. दोन-चार वाक्यांमध्येच इथे आइन्स्टाईन त्याचा अभिप्राय बोलून दाखविताना दिसतो. हा काटेकोरपणा व आटोपशीरपणा त्याच्यामधील शास्त्रज्ञाशी सुसंगत असलेलाच आहे. त्या अभिप्रायामध्ये अवघे तत्त्वज्ञान सामावल्याचे आपण पाहतो, तेव्हा त्याने निर्माण केलेल्या समीकरणामध्येव ऊर्जा सामावलेली होती आणि अण्वस्त्रांचीही शक्यता दडलेली होती, याचे स्मरण होते. लालित्य आणि तत्त्वज्ञान असा सुरेख मेळ जमून आलेले आणि लहान- मोठ्या तपशिलांमधून आइन्स्टाईनचे व्यक्तिमत्व उभे करणारे, असे हे निवेदन, लेखन आहे.

मोजे घालणे हा अनावश्यक उद्योग आहे, असे ठरवून निदान घरी असताना तरी अनवाणी फिरणारा आइन्स्टाईन, आपण कधीच पहिल्या वर्गानं प्रवास करीत नाही, असं सांगताना आइन्स्टाईनचे म्हणणे असे की पहिल्या वर्गाचा डबा आधी पोचतो असे काही नाही. रात्री आपण झोप घेतलीच पाहिजे, असा कायदाच बायकोने केल्यामुळे सध्या आपली आकाशातील ताऱ्यांची भेट होत नाही, असे तो सांगतो आणि लहानपणी संगीताची आवड आईमुळे लागली हे सांगत असतानाच धूम्रपान नकोस, असे डॉक्टरांनी सांगितले असले तरी चोरून ते करू नकोस, असे काही त्यांनी सांगितलेले नाही, अशी पळवाट शोधून खुर्चीवरील बैठकीखालून तंबाखू आणि पाइप काढतो… आइन्स्टाईनमधील हे लहान मूल लोभस आहे.

तुम्ही एकतर युद्धखोर असता किंवा युद्धविरोधी़. युद्धखोर असलात तर प्रश्नच नाही. विज्ञान-तंत्रज्ञानाला उत्तेजन द्या. वित्त, उद्योगधंदे, धर्म, या सगळ्यांना शस्त्रसाठे करण्याच्या कामाला लावा. जितकी घातक बनवता येईल तेवढी बनवा…. एक निश्चितपणे सांगतो, येत्या महायुद्धानंतर युद्ध लढले जाईल ते दगडाधोंड्यांनी…”

विज्ञान म्हणजे बुद्धिमत्ता; पण समूह नेहमीच बुद्धिमत्तेला तुडवत असतो. एखादं शस्त्र बनवायलाही बुद्धी लागते.”

मला विवेकाने जगता येत नसेल, तर जगत नाही मी मनुष्य म्हणून.

सापेक्षतावादाच्या विरोधात शंभर प्राध्यापकांनी एकत्र येऊन एक पुस्तक प्रसिद्ध केले, तेव्हा आइन्स्टाईनची प्रतिक्रिया होतो, “मला वाटतं, माझं म्हणणं चुकीचं असतं, तर एक प्राध्यापकही पुरेसा होता.’ सांगून टाकतो; त्याच्या बायकोबद्दलच्या – मिलेव्हाबद्दलच्या प्रसंगाप्रसंगाने असे प्रकट चिंतन करीत असलेल्या आइन्स्टाईनने

मोकळेपणाने सांगून टाकले आहे. “आयुष्यभराच्या कामानंतर अशी एकही संकल्पना नाही, जिच्याबद्दल मी निःशंक आहे.”

स्वतंत्र लेखनानंद

प्रेबियल इमॅन्युअल यांच्या अत्यंत कसदार अशा लेखनाचा, शरद नावरे यांनी केलेला अनुवाद, रंगमंचावरील प्रयोग पाहताना, स्वतंत्र लेखनाचा आनंद देतो. निखळ मराठी भाषेचे सौंदर्य, ‘सापेक्षता सांगणारा माणूस’ पाहताना, वाचताना प्रत्ययाला येते.

काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या प्रत्ययने मराठीमध्ये ‘किंगलिअर’चा प्रयोग केला, आणि डॉ. शरद भुथाडिया या समर्थ अभिनेत्याचा, मराठी रंगभूमीला रातोरात शोधच लागला. मुंबई-पुण्याला प्रायोगिकतेचे श्रेय परंपरेने दिले जात असताना, ‘किंग लिअर ने प्रायोगिकांना खडबडून जाग आली आणि अर्थातच, किंग लिअरची भूमिका अप्रतिम केल्यानंतर डॉ. शरद भुथाडिया यांच्याकडून अपेक्षा वाढल्या; पण भुथाडियांनी घाई केली नाही. जबाबदारीचे ओझे होऊ दिले नाही. वर्षे गेली आणि पुन्हा एकदा सकस संहिता घेऊन, भुथाडिया अभिनेता दिग्दर्शक म्हणून आइन्स्टाईनच्या निमित्ताने रंगभूमीवर आले आहेत.

आइन्स्टाईनच्या भूमिकेमध्ये भुथाडिया सर्वार्थाने शोभले. एक तर डोळे, डोळ्यांमधील नजर, संहितेमध्ये आइन्स्टाईनचे जे व्यक्तिमत्त्व उमटते, त्यासरशी त्यांची नजर आहे. शांत, विचारी. पापण्यांची बेतशीर फडफड त्याची निदर्शक. भुथाडियांचे रंगमचीय बोलणे ऐकण्यासारखे आहे. स्वच्छ, स्पष्ट आणि प्रवाही. कुठेही उसनी नाट्यात्मता नाही. बोलणे परिणामकारक व्हावे, असा सोस नाही. हातांच्या बोटांची माफक चाळवाचाळव, चालतानाचे दोन पावलांमधील अंतर- चालण्याचा वेगही आइन्स्टाईनचे वाक्य आणि वेळोवेळची मनःस्थिती याच्याशी सुसंगत होती. एका प्रसंगामध्ये गदगदून रडताना, भुथाडियांनी अवधे शरीर त्यामध्ये आणले आणि अस्फुटसादेखील हुंदका दिला नाही हे त्यांच्यामधील अभिनेता व दिग्दर्शक या दोघांच्याही सामर्थ्याचा प्रत्यय देणारे होते…

क्वचित केव्हा पाठांतराची ठेच त्या विशिष्ट प्रयोगात लागली हे खरे; पण तत्त्व भक्कम असताना, अशा तपशिलाला फार महत्त्व देण्याचे कारण नाही. कॉलर ध्वनिक्षेपकामुळे आवाज नियंत्रणामध्ये दोष निर्माण झाला होता. तिकडेही लक्ष देता येईल. पूर्ण प्रयोग भर एकटा आइन्स्टाईनच आहे; तर आता आहे त्या आकारमानाचा रंगमंच आवश्यक नव्हता. अशा काहीशा पसरट रंगमंचामुळे, नटावर लक्ष केद्रित होत नाही. तो रंगमंचावर असूनही, रिकामी जागा, तिचे अस्तित्व राहते., प्रकाशयोजना कार्यकारी स्वरूपाची -इथून तिथे अशा प्रकारची का असावी? नाट्यगृह उशिरा हाती आल्याने असे झाले असेल? अर्थात हे तपशील आहेत. प्रयोगाचे तत्व भक्कम असेल आणि तसे ते होते, तर तपशिलांची काळजी पुढील प्रयोगात घेता येईल.

शेवटचा मुद्दा – एकपात्री प्रयोगासाठी हलकाफुलका जीवनानुभव निवडावा असे ठरून गेल्यासारखे दिसते; पण तात्विकता व लालित्य यांना एकमेकांचे वावडे नसते, हे या प्रयोगामध्ये अनुभवता येते. पण ताकदीचा अभिनेताही पाहिजे, ही देखील एकपात्री प्रयोग एक पूर्वअट आहे, हे एकपात्री कलाकारांच्या लक्षात येईल तर बरे!

– माधव वझे

साभार साप्ताहिक सकाळ / १७ मार्च २००७

(प्रत्यय निर्मित आईन्स्टाईन- सापेक्षता सांगणारा माणूस या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग २ जुलै रोजी कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात होत आहे. त्यावेळी प्रकाशित होणार्‍या स्मरणिकेतील लेख.)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय