Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यपिंपरी चिंचवड : सेवेत कायम करा, मानधनावरील परीचारिकांचा आक्रोश

पिंपरी चिंचवड : सेवेत कायम करा, मानधनावरील परीचारिकांचा आक्रोश

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आंदोलनास पाठिंबा 

पिंपरी चिंचवड : सर्व मानधन स्टाफ नर्सची एकच आस, कायमस्वरुपी हाच ध्यास”, “कायम करा, कायम करा, नर्सला कायम करा”, “आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे”, “एकतेचे बळ दाखवूया, अधिकाराची रक्षा करुया”, “न्याय हा झालाच पाहिजे, अधिकाराची रक्षा झाली पाहिजे”, “हम सब एक है”, अशा जोरदार घोषणा देत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामधील स्टाफ नर्संनी कायमस्वरुपी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. 

आज मंगळवारी हाताला काळ्या फिती बांधून स्टाफ नर्सनी वायसीएमएच समोर प्रशासनाच्या निषेधार्थ निदर्शने केली. यात सर्व परिचारिका, लॅब असिस्टंट, कक्ष मदतनीस सह सहित 304 वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज वायसीएम प्रवेश द्वारासमोर जोरदार निदर्शने करून सेवेत कायम करा अशी मागणी केली.

गेली 10 वर्षे हे सर्व कर्मचारी कंत्राटी, मानधनावर काम करत आहेत. त्यांना पेमेंट स्लिप मिळत नाही, कर्मचारी प्रॉव्हिडेंट फंड, इएसआय सह कोणत्याही सुविधा मनपा प्रशासन देत नाही. कायद्याने बाळंतपणाच्या रजा नर्सेस ना मिळत नाहीत, त्यामुळे गरोदर महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना अनपेड रजा घ्यावी लागते. या सर्व नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी YCM रुग्णालयात  सर्वरोग उपचार, विविध साथीचे आजार, आणि कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम केले आहे.

कामगार न्यायालय पुणे यांनी पुढील आदेश मिळेपर्यंत कोणाला कामावरून कमी करू नये, असा आदेश आयुक्त,मनपा पिंपरी चिंचवड याना दिला आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागातील  मधील 2/3 कर्मचारी कंत्राटी आहेत. 

आकुर्डी, थेरगाव, भोसरी, पिंपरी या ठिकाणी मनपाने कोट्यवधी रुपये खर्च करून प्रशस्त रुग्णालये बांधली आहेत. मात्र त्या ठिकाणी डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठी कोणतीही जाहिरात दिलेली नाही. मनपाने अंदाज पत्रकात फक्त 1 टक्का आरोग्य आणि वैद्यकीय खर्चासाठी किरकोळ तरतूद केली आहे, आणि 200 कोटीचे कर्जरोखे काढून मनपा आरोग्य सेवेचे खाजगीकरण करत आहे.

कंत्राटी नर्सेस सह 304 कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्तांनी कायम स्वरूपी कामावर घ्यावे, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड गणेश दराडे यांनी आंदोलन स्थळी केली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय