महिलांनी स्वतःचे पर्याय निर्माण करण्याची वेळ – बारगजे
आकुर्डी : मध्यम वर्ग, अल्प उत्पन्न गटातील महिला एकत्र आल्या तर सामाजिक आर्थिक क्रांती होईल, आता महिलांनी स्वतःचे पर्याय निर्माण करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन संध्याताई बारगजे यांनी केले.
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने महिला दिनानिमित्त “मला काही सांगायचं आहे” या कार्यक्रमात त्या आकुर्डी येथे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा कॉम्रेड अपर्णा दराडे होत्या.
महिला संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील सेवाभावी संस्थामध्ये काम करणाऱ्या महिलांचे अनुभव कथन दरवर्षी 8 मार्चला सादर केले जाते. एच . आय. व्ही. संक्रमित अनाथ आणि समाजाने नाकारलेल्या मुलांचे संगोपन करणाऱ्या इंफन्ट इंडिया, पाली (बीड) या संस्थेच्या संस्थापक संध्याताई बारगजे यांनी उपस्थित महिलांना संबोधित केले.
पुढे बोलताना बारगजे म्हणाल्या, आपण सरकारकडे मागण्या करतो, सरकार पूर्णपणे आपल्याला काही देत नाही. देशात जास्त श्रमात आणि कमी वेतनात महिला राबत असतात. तरी सुद्धा त्यांचे दारिद्य्र संपत नाही. आपण पर्याय उभा केल्याशिवाय आपली परिस्थिती सुधारणार नाही.
संध्या बारगजे यांनी सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण करताना सांगितले की, “मध्यम वर्ग समस्याग्रस्त आहे.त्यांच्या आर्थिक समस्या वेगळ्या स्वरूपाच्या आहेत. ते राहतात तेथे पाणी पुरवठा वेळेत नसतो. विजेचा लपंडाव सुरू असतो. वर्क फ्रॉम होम मुळे त्यांचे कामाचे तास आणि ताण वाढले आहेत. मध्यम वर्ग आणि अल्प उत्पन्न गटातील महिला एकत्र आल्या तर सामाजिक आणि आर्थिक क्रांती होईल.” “महाराष्ट्राच्या अनेक भागात असे संस्थात्मक प्रयोग यशस्वी झाले आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये घरकाम करणाऱ्या महिलांनी अन्नपूर्णा, बालसंगोपन, जेष्ठ नागरिक सेवा यासाठी संस्था निर्माण कराव्या.
इंफन्ट इंडियाच्या संचालिका वर्षा हूंबे यांनी महिला दिनाचा इतिहास सांगितला. “सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांनी कठीण काळात पर्यायी शिक्षण उभे केले. बाबा आमटे, मदर तेरेसा यांनी उपेक्षितांसाठी संस्था निर्माण केल्या.”
प्रमुख घरकामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बांगडया फोडणार नाही, फोडू देणार नाही. कुंकू पुसणार नाही, पुसू देणार नाही. मंगळसूत्र तोडणार नाही, तोडू देणार नाही. तोंड झाकणार नाही, झाकू देणार नाही, अशी शपथ घेतली. यावेळी गणेश दराडे, बाळासाहेब घस्ते यांनी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.
मेघना गाढवे, शेहनाज शेख, निर्मला येवले, सुषमा इंगोले, गुलनाज शेख, विमल जाधव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी राजश्री जाधव, वसुधा शिंदे, भागीरथी अबुज, वसुधा शिंदे, संगीता देवळे, संगीता बिऱ्हाडे, जिनू कनोजिया, धनश्री कनोजिया, आशा बर्डे, येल्लमा कोलगी उपस्थित होत्या.