राष्ट्रीय गांधी शिल्प बाजारच्या वतीने पिंपरीत हस्तकला आणि हातमाग प्रदर्शन
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.२१- भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालय, विकास आयुक्त कार्यालय (हस्तकला) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय गांधी शिल्प बाजारच्या वतीने पिंपरीत शुक्रवार (दि.२१) पासून राष्ट्रीय हस्तकला आणि हातमाग प्रदर्शनाचे व विक्री दालनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामधे देशातील विविध २९ राज्यातील ३५० कारागीर २५० स्टॉलसह पुण्यातील ११ आणि पिंपरी चिंचवड शहरातील ४ स्टॉल सह महाराष्ट्रातील एकूण ५० स्टॉलवर हस्तकला कारागीर पारंपारिक कलाकृती या प्रदर्शनात सादर करणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर आणि पुण्यातील कलाप्रेमी जाणकारांना कला आणि हस्तकलेचा वारसा पाहण्याची आणि हस्तकला कारागीर ते थेट ग्राहक योजनेतून खरेदीचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वस्त्र मंत्रालय, भारत सरकार (हस्तकला), वरिष्ठ सहाय्यक निर्देशक चंद्रशेखर सिंग यांनी केले आहे.
बुधवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना सिंग यांनी सांगितले की, या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांना या प्रदर्शनास मोफत प्रवेश आणि वाहनांसाठी मोफत पार्किंग आहे. शुक्रवार (दि.२३ फेब्रुवारी) ते रविवार (दि. ३ मार्च) या कालावधीत सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत एच. ए. ग्राउंड, संत तुकाराम नगर, महेश नगर चौपाटी समोर, पिंपरी, पुणे १८ येथे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
मे. इंडियन नारी डेव्हलपमेंट एवंम इम्प्रूव्हमेंट अँड ॲडव्हान्समेंट ऑफ नेशन, नवी दिल्ली, विकास आयुक्त कार्यालय (हस्तकला), वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार हे भारतीय हस्तकला आणि हातमाग यांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करणारी प्रमुख राष्ट्रीय एजन्सी हस्तकलेच्या संवर्धन आणि विकासासाठी, हस्तकला कारागीर यांच्या कल्याणासाठी प्रशिक्षण, प्रदर्शन, विक्री योजना वर्षभर वोकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत राष्ट्रीय गांधी शिल्प बाजार हे आयोजित करत असते. या राष्ट्रीय प्रदर्शनाचा मुख्य उद्देश देशभरातील कारागीर आणि विणकरांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. या राष्ट्रीय प्रदर्शनात ग्राहक आणि कारागीर यांच्यात थेट बाजारपेठ जोडण्याची व्यवस्था, ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन गरजेनुसार डिझाइन तयार करून दिले जाते.
www.Indianhandicraft.gov.in या वेबसाईट वर नोंदणी केलेल्या २९ राज्यातील ३५० कारागिरांचे २५० स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील जी. आय. मानांकन प्राप्त पुणेरी पगडी, कोल्हापूरी चप्पल, वारली पेंटिंग, पैठणी तसेच सोलापूरी चादर टॉवेलचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.
विविध राज्यांतील विकास आयुक्त (हस्तकला) कार्यालयाच्या क्षेत्रीय कार्यालयातून त्यांची निवड केली आहे. यामधे राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिल्पगुरु, राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र धारक, राज्य पुरस्कार विजेते, बचत गट इत्यादींचा सहभाग आहे.
या प्रदर्शनात आर्ट मेटल वेअर, बीड्स क्राफ्ट, केन आणि बांबू उत्पादन, कार्पेट, शंख-शिंपले, बाहुली आणि खेळणी, भरतकाम आणि क्रोशेटेड वस्तू, काच, गवत, पाने, वेत वेळू आणि फायबर उत्पादन, हाताने छापलेले कापड स्कार्फ, इमिटेशन ज्वेलरी, ज्यूट क्राफ्ट, तंजावर पेंटिंग, टेक्सटाईल (भरतकाम), लाकडी वस्तू, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी ज्वेलरी क्राफ्ट, विविध पेंटिंग. छत्तीसगड डोकरा कास्टिंग, मधुबनी पेंटिंग, पंजाबची फुलकारी फॅब्रिक्स अशा विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.