पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : ‘आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, ही प्रतिज्ञा करतो की, देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू.
धर्म, वंश, जाती यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता, प्रलोभनास बळी न पडता, शंभर टक्के मतदान करू. अशी गर्जना सोमवारी हिंदू वीरशैव लिंगायत मंच आयोजित समाज मेळाव्यात वाई मठ संस्थांनचे मठाधिपदी गुरुवर्य महादेव शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत झाली.
सनातन भारतीय संस्कृतीचा आणि हिंदू धर्माचा अविभाग्य भाग असलेल्या वीरशैव लिंगायत सांप्रदायाला अनिष्ट कार्यरतिपासून मुक्त करून समरसतेचे बीज रोवणारे आद्य सुधारक म्हणजे महात्मा बसवेश्वर. ‘मध्ययुगीन कालखंडात धर्मचळवळीच्या माध्यमातूनच नवीन समाजव्यवस्था प्रत्यक्ष आणता येईल, हे महात्मा बसवेश्वरांनी ओळखले होते.
मानवतावादी समाजाच्या आपल्या नवीन कल्पना साकारण्यासाठी त्यांनी आद्य दैवत महादेवाला मानणाऱ्या आणि क्रांतिकारी विचारसरणी असलेल्या समन्वयवादी वीरशैव संप्रदायातील ‘श्रीसिद्धान्तशिखामणी’चा आधार घेतला. मूळच्या व्यापक असलेल्या शक्तिविशिष्टाद्वैत तत्त्वज्ञानाला काला अनुचित रूप दिले.
त्यामुळेच महात्मा बसवेश्वर हे धर्माच्या माध्यमातून नवीन समाजव्यवस्था निर्माण करणारे हिंदू समाजसुधारक ठरले आणि महात्मा बसवेश्वरांनी केवळ आपल्या संप्रदायालाच नव्हे तर हिंदुत्वालाही काळाच्या कित्येक शतके पुढे नेऊन ठेवले असे लेखिका- डॉ. श्यामा घोणसे यांनी त्यांच्या ‘क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर’ या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी मनोगत व्यक्त केले.
समाज मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांचा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
डॉ. अजित गोपछडे यांनी खासदारकी समाजासाठी समर्पित करतो असे आश्वासन दिले आणि वीरशैव लिंगायत समाजाच्या समस्या जाणुन घेतल्या तसेच विविध समस्यांवर राज्य व केंद्र सरकार कडुन ठोस उपाय योजना करून देतो आणि पंतप्रधान मोदी यांच्या कडुन देश पातळीवर योग्य ती मदत लिंगायत समाजाला मिळवुन दिली जाईल असे आश्वासन समाज बांधवाना दिले.
भोसरी येथील कै.अंकुश लांडगे नाट्यगृहांमध्ये हिंदू वीरशैव लिंगायत समाज मेळाव्याचे सोमवारी आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला एस बी पाटील, डॉ. राजेंद्र कोरे, श्रवण जंगम, आमदार उमा खापरे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, शरद गंजीवले, राजेंद्र कोरे, हेमंत हरहरे, अण्णाराय बिरादार व अमित गोरखे, शैला मोळक, वंदना आल्हाट तसेच मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दानेश तिमशेट्टी यांनी केले, सूत्रसंचालन गायत्री चरंतीमठ यांनी केले व गुरुराज चरंतीमठ यांनी आभार व्यक्त केले.