पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस समारंभ थाटात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व फ्रेंड्स ट्रेक क्लबचे अध्यक्ष वसंत ठोंबरे म्हणाले,
–जेव्हा जेव्हा आपण निरोगी जीवनशैलीचा विचार करतो तेव्हा नियंत्रित आणि अत्यंत पौष्टिक आहार, हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. हास्य विनोद, मैत्रीपूर्ण संबंध यामुळे तणावमुक्त जीवन जगता येते, योग,व्यायाम,आहार,विहार समतोल ठेवल्यास जीवन आनंदी होऊन जाते, वयानुसार शरीरातील जैविक प्रक्रियाच नव्हे तर आपल्या शरीराच्या गरजाही मोठ्या प्रमाणात बदलतात, त्यामुळे शरीर व मन संतुलित ठेवण्यासाठी ज्येष्ठांनी काही छंद जोपासले पाहिजेत, असा सल्ला वसंत ठोंबरे यांनी यावेळी दिला.
ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ दर महिन्यात त्या महिन्यात जन्मदिवस असणा-या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो.
मंगळवार १९ मार्च रोजी वंदना सोहोनी, उषा तळपटे, उषा गायकवाड, रमाकांत ताटकर, मधुकर धकाते, दीपक साळुंखे, किसन गायकवाड, आशा राऊत आठ ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस सोहळा विरंगुळा केंद्र, ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ, महात्मा फुलेनगर चिंचवड येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी नगरसेविका योगिता नागरगोजे व युवा कार्यकर्ते सचिन सानप तसेच ज्येष्ठ नागरिक व त्यांचे कुटुंबीय याप्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मार्गदर्शक विश्वास सोहोनी यांनी केले. शिवानंद चौगुले यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप नंतर नागरिकांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.