जात, पात छोडो, हिंदू राष्ट्र को जोडो चा विचार घेऊन सर्व जाती धर्मातील रामभक्त यांचा सहभाग
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि. २० – अयोध्या मध्ये सोमवारी श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. देशभर रामभक्क्तांमध्ये उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. हा आनंद द्विगुणीत करीत बाल गोपाळंसह महिला भगिनींनी शनिवारी पिंपरी येथे काढलेल्या शोभायात्रेत सहभाग घेतला. रामभक्त धनराज बिर्दा यांनी आयोजित केलेली शोभायात्रा शनिवारी सायंकाळी शगुन चौकातून नव महाराष्ट्र विद्यालयापर्यंत काढण्यात आली. ठीक ठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घालून राम रथावर पुष्पवृष्टी करीत राम भक्तांनी रामाचे दर्शन घेतले. यानंतर नव महाराष्ट्र विद्यालयाच्या पटांगणात भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आणि ‘१०८ राम रसायन होम विधी’ आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ रामभक्त हेमंत हरारे यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक विजय लांडे, विश्व हिंदू परिषदेचे पुणे विभाग ग्रामीण मंत्री नितीन वाटकर, विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवड जिल्हा मंत्री धनंजय गावडे, समरसता विषयक सामाजिक कार्यकर्ते विलास लांडगे, बजरंग दलाचे कुणाल साठे, भाजपा अनुसूचित जातीचे राष्ट्रीय सरचिटणीस रामचंद्र चावरिया, महाराष्ट्र सरचिटणीस दिनेश पगारे, नागपूरचे सुधीर जवळकर, तेजस निरभवणे, पिंपरी व्यापारी संघटनेचे गोपी असवाणी, जयंत शिंदे, उमेश शिंदे, निलेश गद्रे आदींसह बाल गोपाळ, महिला भगिनी बहुसंख्य उपस्थित होत्या.
या शोभा यात्रेत पारंपरिक वेशभूषा आणि वारकरी वेषात बालके ताळ, मृदुगांचा गजर करीत श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. तसेच महिलांनी मंगल कलश यात्रा काढून वातावरण भक्तीमय केले. तरुण मुलींनी फुगड्या खेळत, दांडिया खेळून आनंद लुटला. राजस्थानी भगिनींनी केलेले गेर नृत्य लक्ष वेधून घेत होते. होम हवन नंतर महाप्रसादाचे वाटप आले आहे.