Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : मासिक पाळी म्हणजे मन आणि शरीरातील नैसर्गिक बदल असतात- डॉ.प्रतिभा...

PCMC : मासिक पाळी म्हणजे मन आणि शरीरातील नैसर्गिक बदल असतात- डॉ.प्रतिभा कुलकर्णी

विपला फाउंडेशनच्या प्रशिक्षण केंद्रात महिला दिनी विशेष व्याख्यान

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर
: विपला फाऊंडेशन व वुई टुगेदर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त ‘ मासिक पाळी; एक नैसर्गिक शरीरक्रिया, वैज्ञानिक दृष्टी आणि अंधश्रद्धा ‘ या विषयावर डॉ.प्रतिभा निशिकांत कुलकर्णी यांचे ( दि.11 मार्च ) व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. (PCMC )पिंपरी येथील स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या संचालिका प्रा.वैशाली गायकवाड यांनी महिला, मुलींचे कौशल्य विकास आणि निरामय आरोग्यासाठी प्रशिक्षणार्थी मुलींचे प्रबोधन व्हावे, यासाठी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,असे प्रस्ताविक करताना सांगितले.(dr pratibha kulkarni)

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी (ग्रेड २) डॉ.प्रतिभा निशिकांत कुलकर्णी यांनी सांगितले की, मासिक पाळी स्वच्छता अभियान,त्यातील अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य प्रबोधन हा शासकीय कार्यक्रम आहे,सेवाभावी संस्थांनी प्रबोधन करून मासिक पाळी बद्दलचे गैरसमज दूर केले पाहिजेत, असे सांगितले. PCMC



स्किल इंडिया प्रशिक्षणार्थी मुलीसमोर प्रबोधन


मासिक पाळी हा मुलींच्या आयुष्याचा एक नैसर्गिक भाग आहे.पूर्वी अनेक समाजात बालविवाह केले जात होते,परंतु याबाबतीतील गैरसमज,अंधश्रद्धा कमी करण्यात सरकार आणि सामाजिक संस्थांनी वैज्ञानिक प्रबोधन केले आहे, मासिक पाळीच्या काळात केवळ सॅनिटरी नॅपकिन्स पुरता मर्यादित विचार न करता त्यातील शरीर विज्ञान, आहार, विहार मुलींना याची माहिती दिली पाहिजे, असे डॉ.प्रतिभा निशिकांत कुलकर्णी यांनी पिंपरी येथील कार्यक्रमात सांगितले. मुलींना वयाच्या 10-11 व्या वर्षी मासिक पाळी येणे हे एक नैसर्गिक ऋतू चक्र आहे,त्याबद्दल वैज्ञानिक माहिती घेतली पाहिजे,मुली आणि स्त्रियांना यापुढे मासिक पाळीबद्दल बोलण्यास किंवा त्यांच्या शंकांचे निरसन करून घेताना संकोच वाटू नये. जर आपण त्यांना प्रोत्साहन दिले नाही, तर त्या जीवनाच्या विविध पैलूंपासून वंचित राहतील किंवा त्याचे दुष्परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर होऊ शकतात. PCMC

पूर्वी मासिक पाळीत देवपूजा किंवा स्वयंपाक करू नका, असे महिलांना सांगितले जायचे. त्याला वैज्ञानिक दृष्टीने काही कारणे होती. मासिक पाळीत महिलांना आरामाची गरज असते. त्यामुळे महिलांना घरकाम करू दिले जात नव्हते. त्याला आता अंधश्रद्धेच स्वरूप आले आहे. अनेक महिला आजही प्रथा म्हणून घरात स्वयंपाक आणि देवपूजा करीत नाहीत. आराम मिळण्याऐवजी महिलांना या दिवसांत कपडे धुणे यांसारखी अनेक कामे करावी लागतात.



पाळीची प्रक्रिया सुरू होण्याआधी आपल्या शरीरामध्ये होणारे बदल समजून घेतले पाहिजेत, अतिशय कमी शारीरिक वजन अथवा खूप लठ्ठपणा,बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव ,मानसिक तणाव, जंक फूड,इत्यादी कारणांमुळे मासिक पाळीचे चक्र बदलू शकते. त्यासाठी समतोल आहार व योग्य जीवनशैली अंगिकारावी लागेल. जंकफूड, तळलेले पदार्थ न खाता फळं व फळांचा रस, यांचे सेवन करावे. पाळीच्या दिवसांमध्ये भरपूर पाणी, नियमित व्यायाम, भरपूर चालणं व योगासनं यांचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करावा. स्वच्छतेकडे लक्ष देऊन व्हिटॅमिन्स, लोह वेदनाशामक औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत, उच्च शिक्षण,नोकरीत असलेल्या महिला मुलींनी सात्विक पोषण आहार घ्यावा, त्या अधिक सुदृढ राहतील असा सल्ला डॉ.प्रतिभा कुलकर्णी यांनी मुलींना दिला.

यावेळी या अभिनव प्रबोधन व्याख्यानाचे कौतुक करताना चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी पाठक यांनी ‘ बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ‘ केंद्र राज्यसरकारच्या विविध सवलती तसेच लिंगभेद मुक्त मुलींचे जगणे, सुरक्षितता आणि शिक्षणाची खात्री याची माहिती देताना सांगितले की, तुम्ही राहता त्या परिसरात, नोकरीच्या ठिकाणी महिला मुलींना पूर्ण संरक्षण देण्यासाठी त्यांचे लैंगिक शोषण होऊ नये,यासाठी शक्ती कायद्यात कठोर शिक्षेच्या तरतुदी केलेल्या आहेत,मुलींना कोणी त्रास दिला तर महिला पोलिस अधिकारी यांचे दामिनी पथक तातडीने दाखल घेते.



मुलींचे शोषण करणाऱ्या आरोपीस आता जामिनावर सुटका होत नाही, त्यामुळे मुलींच्या बाबतीत होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे, तुम्ही तुमच्या मोबाईल वर मराठी भाषेत याबाबत माहिती उपलब्ध आहे,मोबाईलचा वापर ज्ञान आणि व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी करावा, असे पल्लवी पाठक यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले. वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम सय्यद, सल्लागार मधुकर बच्चे, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी पाठक लता शिंदे,वासंती काळे यांनी या प्रबोधन व्याख्यानासाठी सॅनिटरी नॅपकिन्स, खाऊ आदी भेट वस्तू उपलब्ध करून दिल्या.

वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने सल्लागार मधुकर बच्चे यांनी संस्थेच्या विविध कार्याची माहिती दिली, तसेच स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे समन्वयक प्रा.दीपक जाधव, संचालिका प्रा.वैशाली गायकवाड यांचा सत्कार करून अधिक मदतीचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे संयोजन सारिका जयंत कुलकर्णी, लता अनिल शिंदे, वासंती राजेंद्र काळे, अनिल शिंदे, राजेंद्र काळे, दिलिप चक्रे, जयंत कुलकर्णी, शंकर कुलकर्णी, भूषण भोंडे, सलीम सय्यद मधुकर बच्चे यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा.दीपक जाधव यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय