Sunday, May 19, 2024
Homeविशेष लेखPCMC:कामगार जगत:तळवडे येथील आगीत कष्टकरी गरीब महिला जळून खाक-काय म्हणत आहेत कामगार...

PCMC:कामगार जगत:तळवडे येथील आगीत कष्टकरी गरीब महिला जळून खाक-काय म्हणत आहेत कामगार नेते

औद्योगिक सुरक्षेवर 24 तास लक्ष असणे गरजेचे-85 टक्के अपघातांना व्यवस्थापक, मालक,प्रशासकीय अधिकारी जबाबदार

पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे,चिखली, कुदळवादी,मोशी आणि लगतच्या परिसरात छोटे मोठे सूक्ष्म लघु उद्योग आहेत.हा परिसर पूर्वी मनपा हद्दीत नव्हता.मात्र येथे सहज उपलब्ध होणारी स्वस्त जमीन,भाडेतत्वावर मिळणारे व्यापारी, औद्योगिक गाळे, गोदामे,चाळीचाळीत,छोट्या खोल्यात राहणाऱ्या गरीब मजूर कुटुंबातील हजारो स्वस्त मजूर यामुळे तळवडे ते मोशी या परिसरात वर्कशॉप्स वाढले आहेत.औद्योगिक आस्थापनातील स्क्रॅप संकलन,भंगार विलगिकरण,पॅकिंग,पेंटिंग, रंग,रसायन,फटाका,फर्निचर,कुशन ईई विविध व्यवसाय,लघु,सूक्ष्म उद्योगात शेकडो कामगार असुरक्षित परिस्थितीत काम करत असतात. महाराष्ट्रात रासायनिक,ज्वालाग्राही,स्फोटक उत्पादनाच्या कारखान्यात आणि इतर उद्योगात सुरक्षा प्रणाली अभावी शेकडो कामगारांचे बळी जात आहेत.कामगारांच्या हक्कांची आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेली सरकारी यंत्रणा भ्रष्ट आहे.हप्ते खाऊन सरकारी अधिकारी ग्रीन रिपोर्ट देतात,स्वस्त मजूर पुरवणाऱ्या ठेकेदारामार्फत अतिशय धोकादायक कामे करून घेतात.



आग लागलेल्या बहुतांशी ठिकाणी आग शमवणारे यंत्र नसल्याचे दिसून आले आहे.ज्वलनशील साहित्य असतानाही आग विझवण्यासाठी असणाऱ्‍या उपकरणांचा अभाव दिसतो.त्यामुळे औद्योगिक ठिकाणी अग्निशमन यंत्र बसवणे बंधनकारक करणे गरजेचे बनले आहे.10 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कोणत्याही कंपनी, वर्कशॉप मध्ये कामगारांना काम करण्यासाठी पुरेशी सुरक्षित जागा,प्रक्रियायुक्त धूर,काजळी उसर्जन यंत्रणा, आग प्रतिबंधक साधन सामुग्री, प्रशिक्षित पर्यवेक्षक असलेच पाहिजे.तळवडे, चिखली,मोशी,कुदळवादी हा परिसर एमआयडीसी कार्यक्षेत्रात येत नाही.पिंपरी चिंचवड मनपाने सप्टेंबर 1997 मध्ये हद्दवाढ करून 18 गावे पालिकेच्या कक्षेत घेतली त्यामधील तळवडे, चिखली, मोशी या प्रमुख गावाचे शहरीकरण झाले आहे, मात्र आजही या परीसरात वर्कशॉप्स,लघुउद्योग मोठ्या संख्येने आहेत.या उद्योगांना पर्यायी जागा,व्हेंडरपार्क देऊन त्यांना टाऊन प्लॅनिंग मध्ये सामील करून घेण्यात आलेले नाही.मनपाने टॅक्स वसुलीसाठी महसूलवाढीसाठी व बिल्डरलॉबी करता ही गावे ताब्यात घेतली आहेत.मागील 20 वर्षात या उद्योगांच्या सभोवताली रहिवाशी सोसायट्या व गुंठेवारी घरे बांधली गेली.

पिंपरी चिंचवड आणि लगतच्या औद्योगिक आस्थापनातील चिखली कुदळवाडी,तळवडे परिसरात दुकाने,गाळे,गोदामे,उघड्या जागांवर भंगार विलगिकरण,पॅकिंग,ज्वालाग्राही रसायने,रबर,प्लास्टिक कच्चा माल ईई विविध प्रकारचे व्यवसाय उद्योग आहेत.तेथील कामाच्या जागा पहिल्यास (working conditions,work places) केव्हाही आग लागू शकते,जीवित हानी होऊन परिसर धोक्यात येईल अशा अवस्थेत आहेत.शेकडो कामगार असुरक्षित परिस्थितीत काम करत आहेत.याठिकाणी आगी लागून गोरगरीब कामगार मृत्युमुखी पडून उरवडे मुळशी सारखी दुर्दैवी घटना घडू शकते.संपूर्ण परिसर, पर्यावरण आणि मानवी आरोग्यास धोकादायक आहे.केव्हाही मोठ्या प्रमाणात आगी लागू शकतात.निवासी क्षेत्रात असलेल्या या दुकाने, गाळे स्वतंत्र भंगार पार्क,व्हेंडर्स पार्क साठी अन्यत्र जागा मिळवून द्यावी,अशी मागील काही वर्षांपासून शहरातील लघुउद्योग,पर्यावरणवादी,सामाजिक व सेवाभावी संस्था संघटना सातत्याने करत आहेत. सर्वात मोठी स्मार्ट सिटी अपघात मुक्त व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी,पालकमंत्री,मुख्यमंत्री, प्रशासकीय अधिकारी यांनी संयुक्त पणे कार्यक्षम सामूहिक जबाबदारी पार पाडावी.अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे.

—–
कामगार नेत्यांच्या प्रतिक्रिया


औद्योगिक सुरक्षितता हा औपचारिक दिन झाला आहे
:जीवन येळवंडे

पुणे,पिंपरी चिंचवड मधील नामवंत मोठ्या कंपन्यांनी मागील दोन दशकात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आग प्रतिबंधक उपाययोजना,त्यासाठी स्वतंत्र सेफ्टी अधिकारी नेमले आहेत.तिथे कारखान्यात अपघात होऊ नये यासाठी दररोज सेफ/अनसेफ ऑडिट करण्यासाठी शॉप फ्लोअर टीम स्थापन करून किरकोळ अपघाताची पण कारणमीमांसा केली जाते. महाराष्ट्र सरकारचे औद्योगिक सुरक्षा संचालक अधिकारी एमआयडीसीत सेफ्टी ऑडिट करताना दिसत नाही.स्थानिक प्रशासनाला कोणत्या कंपन्यांमध्ये ज्वालाग्राही रसायने,बॉयलर्स, एलपीजी, सीएनजी,गॅस,डिझेल,पेट्रोल,रबर, प्लास्टिक कच्चा माल किती आहे याची माहिती दिली जात नाही किंवा माहीत असूनही तिकडे दुर्लक्ष केले जात आहे.

कामगार नेते जीवन येळवंडे,अध्यक्ष, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना


फॅक्टरी इन्स्पेक्टर,लेबर अधिकारी कोणासाठी काम करतात
:काशिनाथ नखाते

कष्टकरी महिला कामगारांचा मृत्यू हे व्यवस्थेचे अपयश कुटुंब चालवण्यासाठी म्हणून महिला कामगार गरिबीमुळे कुठेही कसेही काम करायला तयार होतात त्यांना रोजगार मिळतो म्हणून कुणीही गोदामे उभारून धोकादायक स्थितीत काम करावे ही काय गुलामगिरी आहे का याकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष झालेले असून कामगार विभाग एमआयडीसी विभाग अग्निशमन विभाग आणि महानगरपालिका व पोलीस प्रशासन या सर्व प्रशासकीय यंत्रणांचे हे अपयश असून या घटनेला तेही तितकेच जबाबदार आहेत.फॅक्टरी इन्स्पेक्टर नावाचे प्राणी उद्योग परिसरात भटकताना दिसत नाहीत,केवळ अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर धावत पळत येऊन उपयोग नाही घटना दुर्घटना घडण्यापूर्वी योग्य ती सुरक्षिततेची काळजी घेण्याची जी गरज आहे ती होत नाही हे दुर्दैव आहे ती व्हावी अन्यथा या सर्व यंत्रणांच्या समोर तीव्र आंदोलनाची गरज आहे.

कामगार नेते काशिनाथ नखाते:अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ


फॅक्टरी इन्स्पेक्टरनी हप्ते खाऊन मोकळे होऊ नये:क्रांतिकुमार कडुलकर


अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये राष्ट्रीय सुरक्षितता दिनाचे इव्हेंट साजरे केले जातात. मात्र औद्योगिक सुरक्षा 365 दिवस व अहोरात्र अबाधित ठेवण्यासाठी कोणतेही प्रतिबंधात्मक व्यवस्थापन नसते. ते त्यांच्या कामगारांना कायदेशीर औद्योगिक सुरक्षा,कामगार कल्याण,वेतन, सुरक्षा साधने, अपघात विमा,ओव्हर टाइम पेमेंट,आदी कायदेशीर सोयी सवलती पुरेशा देतात का? हे कामगार असंघटित आहेत,आणि ज्या कंपनीत,वर्कशॉप, उत्पादन प्रक्रिया जागेत 10 पेक्षा जास्त कामगार आहेत,त्यांना हे मालक संघटना बनवायला परवानगी देतात का?ठेकेदारामार्फत सर्व कामे करून घेतली जात असली तरी त्याची जबाबदारी मूळ चालक मालक यांचेकडे असते याची काळजी घेणारे लेबर अधिकारी या कंपन्यात कामगार कायदे पाळले जात आहेत का? याची तपासणी करण्यासाठी येतात की शुभेच्छा गिफ्ट घेऊन जातात.

फॅक्टरी इन्स्पेक्टरनी हप्ते खाऊन मोकळे होऊ नये.पिंपरी चिंचवड मधील उद्योगात कंत्राटी कामगारांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. कामगार हा कंत्राटी असंघटित असला तरी तो संविधानिक भारताचा सन्माननीय नागरिक आहे. तो गधा मजूर नाही, त्याला कामगार कायद्याचे संरक्षण मिळाले पाहिजे,त्यासाठी उद्योग त्यांच्या आस्थापनानी कामगार कल्याण व सुरक्षा यासाठी विशेष खर्चाची तरतूद केलीच पाहिजे.कंपन्यांतील कॉटन वेस्ट,सुका कचरा,पाला पाचोळा,रसायने, हिट ट्रीटमेंट,ऑइल डेपो,गोदामे येथील पेट घेऊ शकतील अशा कचऱ्याची विल्हेवाट याचे शास्त्र शुद्ध व्यवस्थापन केले पाहिजे.

औद्योगिक आग प्रतिबंध साठी दैनंदिन,साप्ताहिक सेफ्टी ऑडिट केले पाहिजे. कंपनी अंतर्गत मॉक ड्रिल होत असल्याचे रिपोर्ट ध्वनिचित्र मुद्रित व लेखी रिपोर्ट सह औद्योगिक सुरक्षा संचालक कार्यालयाकडे तसेच स्थानिक प्रशासनाकडे दिली पाहिजेत. स्थानिक प्रशासनाच्या अग्निशमन अधिकाऱ्यांबरोबर कंपन्यांनी आग लागू नये यासाठी मार्गदर्शन घेतले पाहिजे.धोकादायक प्रकियेचा वापर करून सुरक्षा मानके टाळून उत्पादन प्रक्रिया करण्याची मनोवृत्ती व्यवस्थापनामध्ये असेल तर त्या त्या कंपन्यांच्या मनुष्यबळ अधिकाऱ्यांना,जबाबदार ठरवून कंपन्यांचे मालक, संचालक,अधिकारी, पर्यवेक्षक यांच्यावर औद्योगिक सुरक्षा अधिनियम 2016 प्रमाणे कारवाई केली पाहिजे.

क्रांतिकुमार कडुलकर, श्रमिक चळवळीतील कार्यकर्ते

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय