Monday, May 20, 2024
HomeNewsPCMC:सर्व्हिस रोडला बेकायदा पार्किंगचा विळखा!

PCMC:सर्व्हिस रोडला बेकायदा पार्किंगचा विळखा!

बेवारस वाहनांचाही समावेश, स्पाईन रोडवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सर्व्हिस रोडचा वापर केला जातो…

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: चिखली स्पाईन रोडवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी व आजूबाजूच्या सोसायटीमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व्हिस रोडचा वापर केला जातो. मात्र सध्या या सर्व्हिस रोडला बेकायदा पार्किंगचा विळखा पडला आहे. एकीकडे आधीच अनधिकृतपणे थाटलेली हॉटेल, गॅरेज, दुकाने असताना दुसरीकडे फोरव्हीलर, रिक्षा, टेम्पो तसेच बेवारस वाहने पार्क केल्यामुळे सर्व्हिस रोडचा श्वासच कोंडला आहे.

स्पाइन रोडच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी स्पाइन रोडऐवजी अनेक वाहनचालक सर्व्हिस रोडचा वापर करत असतात. कृष्णानगर ते जय गणेश साम्राज्य (नाशिक रोड) परिसरातील सर्व्हिस रोडवर सर्रास वाहनचालकांची ये-जा सुरू असते. मात्र या मार्गावर दुतर्फा केल्या जाणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

शहरात अनेक ठिकाणी बेकायदा वाहने लावली जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या परिसरातील अनेक गृहसंकुले, हॉटेलांना पार्किंगची व्यवस्थाच नसल्यामुळे अनेक फोर-व्हिलर व टू-व्हिलर वाहने ही सर्व्हिस रोडवर पार्क केली जातात. त्यात बेवारस वाहनांचीही भर पडत आहे. गॅरेज व टपऱ्यांमुळे एकीकडे दुचाकी वाहने, तर दुसऱ्या बाजूला फोरव्हिलर वाहनांचे पार्किंग केले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच महापालिकेने वाहतुकीला अडथळा ठरणारी बेवारस वाहने हटविण्याची धडक कारवाई केली होती. मात्र अद्यापही या सर्व्हिस रोडवर बेवारस वाहने हटविण्यात आलेली नाहीत. आधीच अरुंद रस्ता त्यात, वाहनांचे पार्किंग, बेकायदा टपऱ्या, बेवारस वाहने यामुळे वाहनचालकांना या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

चिखली पोलीस स्टेशन समोरच कोंडी

वाहनाचे नियम नागरिकांना सांगणाऱ्या पोलीस स्टेशन कार्यालयासमोरच बेकायदा पार्किंगच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर बेशिस्त वाहतूक थांबे, पासिंगसाठी आलेल्या वाहनांचे पार्किंग हे वाहतुकीला अडथळा ठरत आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या चिखली पोलीस स्टेशन कार्यालयासमोरच निर्माण होत आहे.
-शिवानंद चौगुले (सामाजिक कार्यकर्ता)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय