पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – उघड्यावर कचरा जाळणे हा पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हा आहे. त्यासाठी कठोर दंडात्मक तरतूद करण्यात आली आहे. मात्र, यासंबंधी कारवाई होत नसल्याने नागरिकच नव्हे तर सफाई कर्मचाऱ्यांनाही याची माहिती नाही, अशीच पिंपरी चिंचवडची परिस्थिती आहे. (PCMC)
शनिवारी बर्ड व्हॅली, चिंचवड समोरील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने कचरा पेटविल्याने पसरलेल्या आगीमुळे विद्यानगर परिसरात धुराचे लोट निर्माण झाले होते. त्यामुळे कचरा पेटविण्याचा विषय चर्चेत आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कचरा पेटविण्याचे प्रकार सतत घडतात. नागरिकच नव्हे तर व्यापारी सुद्धा जमा केलेला कचरा पेटवून देतात. अनेक ठिकाणी कित्येक तास आग धुमसत राहते.
यासंबंधी कायद्यात काय तरतुदी आहेत याबद्दल माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले सांगितले की, उघड्यावर कचरा पेटविणे हा पर्यावरण विषयक कायदे आणि भारतीय दंड विधानानुसारही गुन्हा आहे.
जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकांना यावर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. राष्ट्रीय हरित लवादाने २०१५ मध्ये दिलेल्या एका निकालात उघड्यावर कचरा पेटविणाऱ्याला पाच हजार रुपये दंड करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर १३ जून २०१६ रोजी दिलेल्या सुधारित आदेशात हा दंड एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे.
हवा प्रदूषण होते म्हणून पर्यावरण कायद्यानुसार हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय भारतीय दंड विधानातील कलम २७८ नुसार धोकादायक कृत्य म्हणूनही हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय उपद्रवी कृत्य म्हणून कलम २६८, पाण्याजवळ कचरा पेटविला असेल तर कलम २७७ तसेच कलम २६९ नुसारसुद्धा कचरा पेटविणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते.
कचरा कोणी पेटविला याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करायची आहे. याशिवाय ज्यांच्या आवारात कचरा पेटविण्यात आल्याचे आढळून आले, त्यांनाही यासाठी जबाबदार धरण्याची कायद्यात तरतुद आहे.’ असे असले तरी शहरामध्ये मात्र अशा स्वरूपाची कारवाई होताना दिसत नाही. आतापर्यंत कचरा पेटविल्याने कित्येक मोठ्या आगी लागल्याची उदाहरणे आहेत.
गोदामांना आग, उद्यानांना आग, भंगार साहित्याला आग लागण्याच्या घटना अशा निष्काळजीपणामुळे घडलेल्या आहेत. मात्र, त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे अगर भविष्यात घटना घडू नयेत म्हणून कर्मचारी आणि नागरिकांचे प्रबोधन करण्याचे कष्टही महापालिका किंवा प्रशासनाने घेतलेले नाहीत. (PCMC)
बर्ड व्हॅली समोरील मोकळ्या जागेत अनेक अवैध धंदे चालू असतात. शिवाय त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. वेळीच उपाययोजना केली नाही, तर संपूर्ण जागा महापालिकेच्या ताब्यातून निघून जाईल. त्यामुळे नागरिकांना सेवा सुविधा देण्यात अडचणी निर्माण होतील. त्यामुळे तात्काळ कारवाई करून संपूर्ण जागेला सुरक्षा भिंत घालून सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी.
–शिवानंद चौगुले (सामाजिक कार्यकर्ते)
हे ही वाचा :
अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन
जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !
चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली
मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !