Tuesday, December 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आज झालेल्या जनसंवाद सभेत...

PCMC : पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आज झालेल्या जनसंवाद सभेत महापालिकेच्या वतीने आवाहन

पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर : महापालिकेच्या उपक्रमात शहरातील नागरिकांचा महत्वपूर्ण सहभाग असतो, त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक, नैसर्गिक रंग वापरून, पाण्यात सहज विरघळणाऱ्या शाडू मातीच्या मूर्तीची निर्मिती करावी. तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. असे आवाहन आज झालेल्या महापालिकेच्या जनसंवाद सभेच्या माध्यमातून करण्यात आले. (PCMC)

नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने व्हावे यासाठी महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते.

त्यानुसार महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली. या जनसंवाद सभेत ८० नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १४, १२, ३, ६, ५, १६, १५ आणि ९ नागरिकांनी उपस्थित राहून सूचना मांडल्या.

गणेशोत्सव विसर्जनासाठी लागणारे कृत्रिम हौद उपलब्ध करून द्यावेत, चोकअप झालेली ड्रेनेजलाईन स्वच्छ करावीत, पावसामुळे पडलेले खड्डे बुजवावेत, ड्रेनेज कामासाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजवून डांबरीकरण करावे, स्मशानभूमीत दशक्रिया विधीसाठी असलेले छत तपासून दुरुस्त करावे, क्रीडा संकुलांमध्ये वाढलेले गवत काढावे, अनधिकृत दुकानांवर कारवाई करावी, सार्वजनिक शौचालयात वीज आणि लाईटची व्यवस्था करावी आदी सूचना आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी मांडल्या. (PCMC)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण पूरक उत्सव साजरे करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असून गणेशोत्सव काळात शहरातील नागरिकांनी पीओपी उत्पादनापासून तयार केलेली मूर्ती स्थापन न करता पर्यावरणपूरक म्हणजेच शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना करावी. विसर्जनासाठी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणी गणपती बाप्पांचे विसर्जन करावे तसेच महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय