Thursday, May 2, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडदेशभक्त सरकारने सैन्याचे बजेट 63 हजार कोटीने कमी केले - खासदार संजय...

देशभक्त सरकारने सैन्याचे बजेट 63 हजार कोटीने कमी केले – खासदार संजय सिंग यांची टिका

कार्पोरेट उद्योगपतींची 11 लाख कोटींची कर्जे माफ केली

पुणे : आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने महाराष्ट्र युवा अधिवेशन 2022 अण्णाभाऊ साठे सभागृह बिबेवाडी येथे आज दिनांक 31 जुलै रोजी पार पडले. या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे आम आदमी पार्टीचे राज्यसभेवरील खासदार संजय सिंग यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मोदींच्या नेतृवाखालील भाजप सरकारने जल, जमीन, विमानतळ, रेल्वे, सरकारी कारखाने, विमा, तेल आणि वीज उद्योग विकले आहेत.

त्यांनी त्यांच्या कार्पोरेट उद्योगपतींची 11 लाख कोटी रुपयांची कार्पोरेट ची कर्जे माफ केली आहेत,माहिती अधिकारात संपूर्ण तपशील आज उपलब्ध आहे. देशातील बेरोजगार युवक युवतींना अच्छे दिन आणण्यासाठी सरकारकडे कोणतीही योजना नाही. असा आरोप आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजयसिंग यांनी पुणे येथील आप युवा अधिवेशनात केला आहे. पुणे येथे आप युवा अधिवेशनाचे उदघाटन संजयसिंग यांचे हस्ते झाले. स्वतःला देशभक्त म्हणवणाऱ्या मोदी सरकारने अग्निपथ योजना आणून सैन्याचे मनोबल कमी केले आहे.

देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी अतिप्रशिक्षित सैन्यदल भारताचे आहे. दरवर्षी सैन्यदलातून 36 हजार सैनिक निवृत्त होतात, सरासरी 10 वर्षात 3 लाखाहून जास्त सैनिक निवृत्त होतात तेव्हा त्यांची जागा नव्या अति प्रशिक्षित सैन्याद्वारे पूर्वीच्या प्रथे प्रमाणे भरली जायची आता फक्त दरवर्षी 40 हजार सैनिक चार वर्षासाठी नियुक्त करणार आहेत. किमान 15 ते 19 वर्षे सैन्यदलात सैनिक काम करून पेन्शन घेत असे. आता ही हंगामी सैन्य भरती देशाच्या संपूर्ण संरक्षणासाठी कशी काम करू शकेल?

सरकारच्या अर्थनीती वर ते टीका करताना म्हणाले की, या देशातील युवक, युवती, कामगार, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक अंगमेहनती वर्ग जी काही कमाई करून थोडेफार बँकेत ठेवत होता त्या बँका सुद्धा आता विकल्या गेल्या आहेत. या सरकारच्या काळात हिंदू मुस्लिम समाजात दुफळी निर्माण झाली आहे. विशिष्ट धर्म, वंश यांचा तिरस्कार करून जगातील कोणतीही राजवट टाकलेली नाही.

महाराष्ट्र ही विचारवंतांची सुजलाम सुफलाम भूमी

सामाजिक धार्मिक सलोखा असलेली व्यापार उदीम, रोजगार देणारी उद्यमशील आणि विचारवंतांची भूमी आहे. मात्र येथील राज्यपाल शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करतात. त्यांचे मानसिक स्थैर्य बिघडलेले आहे, त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य ते करत असतात. असा आरोप संजय सिंग यांनी केला आहे.

या युवा अधिवेशनाचे आयोजन आम आदमी पार्टी व आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वात युवा आघाडीचे राज्य उपाध्यक्ष संदीप सोनवणे व युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. यावेळी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला, राज्य निवडणूक प्रमुख महादेव नाईक, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रंगारी, संघटन मंत्री विजय कुंभार राज्य सचिव धनंजय शिंदे संदीप देसाई इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश इंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले युवा कार्यकर्ते नाशिकचे अभिजीत गोसावी, नागपूरच्या कृतल आकरे, कोल्हापूरचे उत्तम शिंदे यांनी युवकांच्या वतीने मनोगते व्यक्त केली.

  • क्रांतिकुमार कडुलकर
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय