Sunday, December 8, 2024
Homeराज्यसंतापजनक : सांगलीत नीट परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी

संतापजनक : सांगलीत नीट परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी

सांगली : नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एक धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. परीक्षा केंद्रावर जातात त्यांना कॉपी टाळण्यासाठी उमेदवारांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उतरवरुन त्यांनी उलटे परिधान करण्यासाठी सांगण्यात आले, अशी तक्रार काही विद्यार्थ्यांनी पालकांकडे केली. या संतापजनक प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पालकांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार केली आहे.

नेमका काय घडला प्रकार?

सांगली शहरातील कस्तुरबा वालचंद महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना परीक्षेला बसण्याआधी एका रुममध्ये जात कपडे उलटे घालण्यास सांगण्यात आले, असा आरोप आता काही विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांचे कपडे बाहेर येताच उलटे दिसल्याने पालकांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर घडलेल्या प्रकारावर पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

महाविद्यालयाकडून स्पष्टीकरण

दरम्यान, सांगलीतील या धक्कादायक प्रकरणानंतर ज्या ठिकाणी परीक्षा पार पडल्या त्या कॉलेज प्रशासनाकडून आपला या परीक्षेची कसलाही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात येत आहे. केवळ परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याच्या पलीकडे आपला या परीक्षेशी कसलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.

तपासणी अतिशय चुकीची

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, देशभरात एकाच वेळी झालेल्या नीट परीक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची अत्यंत चुकीची तपासणी केल्याच्या घटना देशभरात घडल्याचे माध्यमांनी समोर आणले आहे. आपल्या राज्याबाबत बोलायचे झाल्यास, सांगलीमध्ये विद्यार्थिनीला कपडे उलटे घालायला लावणे, अंतर्वस्त्र तपासणे अशा तक्रारी आल्या आहेत. तक्रार दाखल झाल्याने सांगलीमधील प्रकार समोर आला आहे.

वैद्यकीय शिक्षण संचालकांनी अहवाल सादर करावा

चाकणकर पुढे बोलताना म्हणाल्या की, ही परीक्षा संपूर्ण राज्यभरात अनेक केंद्रांवर घेतली गेली. अनेक केंद्रांवर काय झाले आहे, याची माहिती घेणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी कॉपी होऊ नये म्हणून काळजी घेत असताना विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होईल अशी तपासणी अतिशय चुकीची आहे. अशी तपासणी करण्याच्या सूचना कोणी दिल्या? असे अधिकार त्या अधिकाऱ्यांना आहेत का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभरातील प्रकारांची चौकशी करणे गरजेचे आहे. राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय