पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१ महाराष्ट्रातील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी शासनाच्या उद्योग संचनालयामार्फत राज्यभर महा-६० उद्योजकता विकास कार्यशाळा घेण्यात येत आहेत.याअंतर्गत पुणे जिल्हा उद्योग केंद्र व पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) वतीने गुरुवारी (दि. ४) ‘महा-६०’ उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी आवश्यक कौशल्य व प्रशिक्षण मिळावे,यासाठी महाराष्ट्र सरकारने कॉर्नेल विद्यापीठाच्या सहकार्याने ‘महा-६०’ उद्योजकता विकास कार्यक्रम सुरू केला आहे.या कार्यक्रमांतर्गत दरवर्षी किमान साठ नवउद्योजकांना प्रशिक्षित केले जाणार आहे.
‘महा-६०’ कार्यक्रमाबाबत तसेच उद्योजकता विकासाबाबत अधिक जागरूकता वाढविण्यासाठी आणि जिल्ह्यात उद्योजकतेची परिसंस्था निर्माण करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा जिल्ह्यातील सर्वस्टार्टप्स,इनक्युबेटर्स,महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले तसेच नुकतेच उत्तीर्ण झालेले विद्यार्थी,जिल्ह्यातील युवा वर्ग,नव उद्योजक,स्थानिक उद्योजक,आपले उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छित असलेल्या व्यक्ती या कार्यशाळेचा लाभ घेऊ शकतात.
या कार्यशाळेत उद्योग विभागाचे अधिकारी,महा-६० कार्यक्रमातील यशस्वी प्रशिक्षणार्थी,सिडबीचे अधिकारी,उद्योजकते मधील तज्ज्ञ व्यक्ती, तसेच स्थानिक यशस्वी उद्योजक मार्गदर्शन करणार आहेत.या एक दिवसीय कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी http://tinyurl.com/MAHA-Cornell
या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी श्रीजीत नायर भ्रमणध्वनी क्रमांक ९९७०२३९८२५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.