Sunday, May 12, 2024
Homeजिल्हा15 नोव्हेंबर आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यास बिरसा फायटर्स संघटनेचा विरोध

15 नोव्हेंबर आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यास बिरसा फायटर्स संघटनेचा विरोध

नंदुरबार : 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती ऐवजी आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करण्याच्या निर्णयाचा बिरसा फायटर्स संघटनेने विरोध दर्शवला आहे. 9 ऑगस्ट हाच आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोवींद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केन्द्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकासमंत्री अँड. के.सी.पाडवी यांच्या कडे निवेदन देऊन केली आहे. 

              

निवेदनात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र संघात 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यासाठी घोषीत केला असून तशी मान्यता दिली आहे. तेव्हापासून आदिवासी समाज 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणजेच आदिवासी गौरव दिवस  म्हणून धूमधडाक्यात साजरा करीत आलेला आहे. 9 ऑगस्ट हाच आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे.

आदिवासींचा आत्मसन्मानासाठी व अस्मिता जपण्यासाठी, आदिवासी समूदायाचे मानवी हक्क संरक्षण करण्यासाठी, आदिवासींचे जल जंगल जमिनीवरील अधिकार अबाधित राखण्यासाठी, आदिवासी संस्कृतीची ओळख व्हावी,आदिवासींच्या सन्मानासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगामध्ये INTERNATIONAL DAY OF THE  WORLD INDIGENOUS PEOPLE अर्थात विश्व आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत 9 ऑगस्ट 1994 ला जिनिव्हा शहरामध्ये जगातील आदिवासी प्रतिनिधींनी पहिला जागतिक आदिवासी दिवस साजरा केला. UNO ने 21 डिसेंबर 1994 ते 20 डिसेंबर 2004 पर्यंत पहिले आदिवासी दशक घोषीत केले व 16 डिसेंबर 2005 ते 15 डिसेंबर 2014 पर्यंत दुसरे विश्व आदिवासी दशक म्हणून घोषीत केले.

                     

परंतु केंद्र सरकारने 15 नोव्हेंबर 2021 रोजी बिरसा मुंडा जयंती निमित्त आदिवासी गौरव दिवस साजरा करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे तीव्र विरोध करीत आहोत.कारण संयुक्त राष्ट्रसंघाने 1993 मध्ये UNWGEP च्या 11 व्या अधिवेशनात सादर केलेल्या आदिवासी हक्कांच्या घोषणा फाॅर्मचे स्वरूप  9 ऑगस्ट 1994 रोजी जगभरात अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश दिले. तेव्हा पासून 9 ऑगस्ट  हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणजेच  आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस ची  मान्यता दिलेली असताना व आदिवासी समुदाय वर्षानुवर्षे हा आदिवासी गौरव दिवस म्हणून  साजरा करीत असताना पुन्हा 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्याची गरज नव्हती. भारत सरकारला संयुक्त राष्ट्र संघाचा  निर्णय नाकारून चालणार नाही. कारण भारताच्या प्रतिनिधींच्या उपस्थित 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषीत करण्यात आला आहे. 

एकच दिवस आदिवासी समाजाने 2 वेगवेगळ्या तारखेला 2 वेळा साजरा का करावा?15  नोव्हेंबर रोजी आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करण्याच्या केन्द्र सरकारच्या निर्णयामुळे आदिवासी समाजामध्ये एक संभ्रम निर्माण केला गेला आहे. शिवाय या निर्णयातुन  आदिवासी समाजाला 2 गटात विभागण्याचे,आदिवासी समूदायाला तोडण्याचे,क्रांतीसूर्य  बिरसा मुंडा यांची  जयंती   साजरा करण्यात  बाधा आणण्याचे षडयंत्र दिसून येते. म्हणून 15 नोव्हेंबर या दिवशी आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करण्यास आमच्या संघटनेचा विरोध असून हा विरोध  कायम राहील. तेव्हा 15 नोव्हेंबर  रोजी फक्त क्रांतीसूर्य  बिरसा मुंडा जयंती साजरा करण्यात यावी.या निवेदनाद्वारे आपणास कळविण्यात येते की, 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा जयंती ऐवजी आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करण्याच्या निर्णयाचा आदिवासी समाजाचा विरोध असून सदर निर्णय तात्काळ मागे घ्यावा.अन्यथा आदिवासी समाजातर्फे केन्द्र सरकारच्या  या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची नोंद घ्यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय