Saturday, May 18, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषमाझ्या अण्णाभाऊंना खुले पत्र... - बुद्धभूषण जाधव

माझ्या अण्णाभाऊंना खुले पत्र… – बुद्धभूषण जाधव

प्रिय अण्णाभाऊ, 

        खरतर सुरुवातचं चुकली. आदरणीय अण्णाभाऊ अशी सुरुवात करायला हवी होती. पण कसं आहे ना.! मला खूप जास्त फॉर्मल पत्र नाही लिहायचं. हे तर माझ्या अण्णाभाऊसाठी लिहीत आहे. आणि सगळ्यांना माहीत आहे. तुम्ही कधी प्रमाणबद्ध भाषेच्या भानगडीत नाही पडला. तुम्ही जे पाहिलं, अनुभवलं, जगलं ते लिहिलं. खरतरं तुमची माफी मागायला हवी, जागतिक कीर्तीचे लेखक, कलावंत असूनही तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत उपेक्षिताचे जीवन जगावं लागलं. तुमचं साहित्य हे नेहमीच जागतिक कीर्तीचे आहे. कारण तुमच्या साहित्याला वास्तवाची जोड आहे. जात आणि वर्ग व्यवस्थेचे दाहक सत्य मांडताना. तुम्ही तटस्थ वाटता. जन्माने गुन्हेगार ठरवलेल्या जातीचे नायक तुम्ही साहित्याच्या जगाला दिले. एक, दोन नव्हे तर तब्बल त्रेचाळीस जातीचे नायक देणारे तुम्ही एकमेव साहित्यिक असाल. अस मला वाटत. त्याकाळात आणि आजही काही प्रमाणात एक वाद कायम आहे. ‘कलेसाठी कला, की जगण्यासाठी कला. ‘आणि तुम्ही ‘जगण्यासाठी कला’ हे तुमच्या साहित्यातून जगाला सांगितले. तुमच्या साहित्याचं भांडवल कधीच सूर्य, चंद्र, तारे नव्हते. तुमच्या साहित्याचं मुळंच माणूस होता. समाजातील वंचित, कष्टकरी, दलित, भटके, स्त्रीया यांच्या व्यथा वेदना हेच तुमचं साहित्य. तुमच्या साहित्याचं मूळ माणसात असलं तरी तुम्ही आम्हाला सांगितलं की निसर्ग ही निर्जीव वस्तू नाहीये ती तुमच्या जगण्याचे प्रेरणास्त्रोत आहे. साहित्य, कविता निर्मितीचा केंद्र काय असला पाहिजे यावरच तुमचं मत वाचलं की पुन्हा एकदा ‘जगण्यासाठीच कला असते हे पटतं. तुम्ही म्हणता, ‘प्रियसीच्या गालावर असलेल्या तिळाच वर्णन म्हणजे साहित्य की डमडमच्या लढ्यात छातीवर गोळ्या झेलणाऱ्या माणसांच्या जखमेतून येत ते साहित्य’.

       मराठी चित्रपटाने तमाशातील ‘लावणी’ या कला प्रकाराची खूप मोठी अवहेलना केली आहे. त्याच्यात परिणाम म्हणून आता तमाशा कालबाह्य ठरला आहे. पण तुम्ही त्यावेळी लावणीतील श्रुंगारीक भाव बाजूला करत. लावणीला सामाजिक आशय दिला. समतेचा विचार दिला. राजकीय व सामाजिक संघर्षाची पहिली छक्कड ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया कायली.’ तुम्ही दिली. हीचं छक्कड पुढे लावणी झाली. पण त्यातून तुम्ही बीदर, भालकी, बेळगाव महाराष्ट्रापासून वेगळा झाला याची खंत व्यक्त करता. तुमची मुंबईची लावणी आजही तितकीच प्रसिद्ध आहे. कारण मुंबईसारख्या मायानगरीच वर्णन करताना तुम्ही मुंबईला विषम समाजव्यवस्थेचं प्रतीक संबोधल आहे.

‘मुंबईत उंचावरी।

मलबार हिल इंद्रपुरी।

कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती।

परळात राहणारे, रात दिवस राबणारे।

मिळेल ते खाऊन घाम गाळती।’

         तुमच्या लिखाणातून वाहणारा निखळ नैतिकतेचा झरा, एकूण साहित्यातील बंडखोर, परिवर्तनवादी, नास्तिक, मानवतावादी तत्वज्ञान समाजात रुजवणाऱ्या माणसाची अवहेलना या देशात होणारच. कारण माणसांना चौकटीत कोंडण्याचा केविलवाणा हट्टहास असल्याने अजून तरी तुमच्या मोठेपणाचे मूल्यमापन होऊ शकल नाही. तरी या नव्या भारताला नव्या मानवतावादी क्रांतीचा मार्ग तुमच्या साहित्यातून सापडेल यात शंकाच नाही. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

तुमचाच साथी,

बुद्धभूषण जाधव

औरंगाबाद

(लेखक हे पत्रकारितेचे विद्यार्थी असून औरंगाबाद येथे राहतात)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय