जागतिक परिचारिका दिन साजरा
डहाणू : परिचारिका या आरोग्य सेवेच्या रक्त वाहिन्या आहेत असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त उप जिल्हा रुग्णालय डहाणू व तलासरी मधील उधवा येथील सीसीसी सेंटर येथे प्रतिपादन केले. दरम्यान परिचारिका यांना सेनीटायझर, मास्क, व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, ‘रुग्ण सेवा, हीच ईश्वर सेवा’ मानून कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी आपल्या जीवाची परवा न करता अहोरात्र सेवा देणाऱ्या तमाम परिचारिका यांना माझा सलाम. दर वर्षी १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा होतो. इसवी सन १८५४ मध्ये क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शुश्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून परिचारिकांनी रुग्णांची केलेली सेवा व त्या योगे करत असलेल्या मानवतेचा सेवेचा गौरव करण्याचा हा दिवस आहे. आज गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे सर्वजण घरबंद झाले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुगांची संख्या आणि मृत्यूचे आकडे हे सर्वसामान्यांची झोप उडवत आहेत. अशाही स्थितीत परिचारिका या मोठ्या हिम्मतीने रुग्णसेवेला प्राधान्य देतात.
रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या देखरेखीखाली असतो. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची परिचारिका अहोरात्र सेवा करीत असतात. रुग्णाला सकारात्मकता प्रदान करण्याचे, त्यांना आनंद देण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत असतात. कोरोनासारख्या संकट काळात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. कुटुंबांची, मुलांची, प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटून या कोरोना योध्दा आपली सेवा अत्यंत चोखपणे बजावत आहेत. सध्याचा काळ हा आरोग्य सेवेतील महत्त्वाचा काळ मानला जात आहे. या काळात सेवा देताना परिचारिका दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आलेखही खाली येत आहे. त्यात आता रुग्णसंख्या कमी होताना परिचारिकांनी दिलेली सेवा मोलाची ठरली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. याप्रसंगी, डॉ. लोंढे, डॉ. पटेल, डॉ. आदित्य अहिरे, कॉ. अक्षय दवणेकर व तमाम परिचारिका उपस्थित होत्या.