Thursday, May 2, 2024
Homeराज्यपुण्यात निखिल वागळेंवर भ्याड हल्ला, गाडी फोडली! निर्भय बनो कार्यक्रमातून वागळे भाजपवर...

पुण्यात निखिल वागळेंवर भ्याड हल्ला, गाडी फोडली! निर्भय बनो कार्यक्रमातून वागळे भाजपवर कडाडले..

पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला करण्यात आला आहे. ही घटना काल 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. पुण्यात आयोजित निर्भय बनो या कार्यक्रम भाजप कार्यकर्त्यांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला.पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमाचे साने गुरुजी हॉलमधे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाआधी पत्रकार निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी पुणे भाजपच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसेच हा कार्यक्रम उधळून लाऊ असाही इशारा दिला होता. मात्र भाजपने कार्यक्रमास विरोध केल्यास आपण या कार्यक्रमास सुरक्षा पुरवू असं महाविकास आघाडीने म्हटले होते. याचपार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी जमले होते. दुसरीकडे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. निखिल वागळे यांना पोलीस बंदोबस्तात घेऊन येत असताना भाजपकडून त्यांची गाडी फोडण्यात आली.



वागळे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच खंडोजी बाबा चौक येथे त्यांच्या वाहनांवर शाई आणि दगड फेकण्यात आले. त्यात त्यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या. यावेळी त्यांच्याबरोबर गाडीत वकील असीम सरोदे हे देखील होते. या घटनेबाबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली आहे. हल्लेखोर कोणीही असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यासाठी मी त्वरित पोलीस आयुक्तांशी संपर्क साधणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनीही कायदा कोणीही हातात घेऊ नये. तसे करणाऱ्यांवर कारवाई करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे आणि ते ती पार पाडतीलच, असे सांगतानाच फडणवीस पुढे म्हणाले की, वारंवार जनतेच्या भावना भडकवणारी वक्तव्य कोणी करू नये. विशेषतः देशाच्या सर्वोच्च नेत्यावर अनाठायी टीका केली जाणार नाही याची काळजी घेणे प्रत्येकाने आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर करण्यात आल्यानंतर वागळे यांनी त्यांच्याबद्दल आणि पंतप्रधान मोदी यांच्या बद्दलही वादग्रस्त पोस्ट केली होती. या पोस्टमुळेच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल संताप निर्माण झाला आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय