वडवणी (बीड) : महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत संयुक्त सक्रिय क्षयरूग्ण व कुष्ठरोग शोध मोहिम यशस्वी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत गावोगावी जावून आरोग्य अधिकारी व कर्मचारी आशा सेविका यांनी योग्य प्रकारे सर्व्ह करणार आहेत. या मोहिमेत कुठल्याही प्रकारे हालगर्जी पणा होता कामा नये असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. आर. बी. पवार, वैद्यकीय अधिकारी डाॅ ज्ञानेश्वर निपटे यांनी शुक्रवार रोजी आढावा बैठकीत सुचना दिल्या.
1 डिसेंबर पासुन कुष्ठरूग्ण शोध अभियानाला सुरूवात होणार आहे. राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिनांक 1 ते 31डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान व सक्रीय क्षयरूग्ण शोध मोहिम अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान राबविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पवार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डाॅ. संजय कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सचिन शेकडे, डाॅ. लक्ष्मीकांत तांदळे, यांच्या आदेशानुसार तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एम. बी. घुबडे यांचा निगराणीत 3 वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांची तालुक्यात निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात एक पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य साहाय्यक व साहाय्यिका हे घरोघर जावून कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी व सर्वेक्षण करणार आहेत.
निदान न झालेले कुष्ठरूग्ण शोधून त्यांना तात्काळ औषध उपचाराखाली आणून नविन कुष्ठरोग शोधणे व विविध औषधोपचारांद्वारे या संसर्गाचे साखळी खंडीत करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या सोबतच कुष्ठरोगा विषयी जनजागृती करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हे अभियान महत्वपुर्ण ठरणार आहे. तेव्हा प्रत्येक नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आलेल्या आरोग्य पथाकाला आपल्या आजाराबाबत योग्य माहिती द्यावी माहिती लपवू नये. तालुक्यातील नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुधारणार असल्याचे डाॅ. पवार व डाॅ. निपटे यांनी सांगितले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एम. बी. घुबडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. बाळासाहेब तांदळे, डाॅ. अरूण मोराळे, डाॅ. घोरड, कुष्ठ रोग तज्ञ बी. डी. तांगडे, क्षयरोग तालुका पर्यवेक्षिका एच. बनसोडे, सह आशा गटप्रवर्तक श्रीमती मांटे एस. एस., आरोग्य सेविका, कर्मचारी उपस्थित होते.