दिल्ली : गेले तीन दिवस भाजपच्या केंद्र आणि हरियाणा सरकारने हजारो शेतकऱ्यांविरुद्ध अश्रूधूर, वॉटर कॅनन, कार्यकर्त्यांना अटक अशा प्रकारच्या सरकारच्या अटकावाला झुगारून अखेर हजारो शेतकरी दिल्लीत घुसले. शेतकऱ्यांची शक्ती, एकजूट आणि निर्धारापुढे केंद्र सरकारला शरणागती पत्कारून दिल्लीत बुरारी या भागात एक मोठे मैदान शेतकऱ्यांसाठी द्यावे लागले.
पण दिल्ली-हरियाणा सीमेवर सिंघु बॉर्डर आणि टिकरी बॉर्डर या दोन ठिकाणी पंजाब आणि हरियाणाचे सुमारे दोन लाख संतप्त शेतकरी हजारो ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन गेले दोन दिवस राष्ट्रीय महामार्गावर आपल्या मागण्या धसास लावण्यासाठी स्वतःच ठाण मांडून बसले आहेत.
आज अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस हनन मोल्ला, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व राष्ट्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्ण प्रसाद यांनी दिल्ली शहरापासून ४० किमी दुरीवर असलेल्या सिंघु बोर्डरला जाऊन तेथील शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. किसान सभेसह पंजाब आणि हरियाणातील अनेक किसान संघटना या आंदोलनात सामील आहेत.
त्याचबरोबर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे इतर नेते मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, योगेंद्र यादव, सुनीलम, कविता कुरुगंटी, किरण विसा यांनीही सिंघु बॉर्डर येथे जमलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला.
२६ – २७ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक प्रमाणात यशस्वी झालेला कामगार-कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप आणि शेतकरी-शेतमजुरांचे देशव्यापी आंदोलन या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीजवळ या किसान संघर्षाने पेट घेतला आहे.
सरकारने चर्चेला बोलवले असले, तरी 3 शेतकरी कायदे मागे घेण्याची प्रमुख मागणी शेतकरी करत आहेत.