Friday, April 26, 2024
Homeशिक्षणनांदेड : स्वाधार शिष्यवृत्तीची थकीत रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करा; मजदूर युनियनचे...

नांदेड : स्वाधार शिष्यवृत्तीची थकीत रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करा; मजदूर युनियनचे बेमुद्दत ठिय्या आंदोलन 

नांदेड : दि. 30 जून रोजी सकाळी 11.30 वाजता पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ज्ञानमाता शाळे जवळ नांदेड येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचे हफ्ते तात्काळ पात्र असणाऱ्या अर्जदारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावेत म्हणून CITU सलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन च्या वतीने बेमुद्दत ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.

आंदोलनातील प्रमुख मुद्दे : 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरुवात सन 2016-17 मध्ये झाल्यानंतर दर वर्षी अर्थसंकल्पामध्ये शेकडो करोडो रुपयाची तरतूद केलेली आहे. परंतु गरजू व गरीब विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत नाही. दिनांक 30 मे ते 1 जून 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर स्वाधार चे हप्ते तात्काळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत. म्हणून तीन दिवस सिटूच्या वतीने अखंड उपोषण केले आहे.

राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घेतली असता कोरोणाच्या काळात देखील दरवर्षी विद्यार्थ्यांचे पैसे संबंधित समाज कल्याण कार्यालयाला वर्ग केले आहेत. परंतु विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर अध्याप पैसे जमा झाले नसल्यामुळे दररोज शकडो विद्यार्थी समाज कल्याण कार्यालयात जाऊन चौकशी करून येरजारा मारत आहेत. नांदेड समाज कल्याण कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना उडवा उडवीची उत्तरे दिल्या जात आहेत.

या आंदोलनात मजूर, असंघटित कामगार, हॉकर्स असे पालक देखील सामील झाले होते. एसएफआय आणि डीवायएफआय विद्यार्थी व युवा संघटनेने आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला आहे. मागील दोन्ही वर्षाचे स्वाधारचे हप्ते विध्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याशिवाय आम्ही समाज कल्याण कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका घेतली असल्यामुळे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त डॉ.तेजस मालवतकर यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास आपल्या कक्षात निमंत्रित करून चर्चा केली असून पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु केली असून दोन दिवसात बँक खात्यावर पैसे जमा होतील असे सांगितले.

त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर गायकवाड, मारोती केंद्रे, करवंदा गायकवाड, लता गायकवाड, श्याम सरोदे, जयराज गायकवाड आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील बावीस हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत, असे देखील माळवतकर म्हणाले. दिनांक 27 जून रोजी आंदोलनाची नोटीस दिल्यामुळे दि.29 जून रोजी पात्र, अपात्र व त्रुटीतील यादी कार्यालयात लावण्याचे सौजन्य समाज कल्याण विभागाने दाखविले आहे. आणि बावीस हजार अर्जदारांपैकी केवळ 148 पात्र लाभार्थी आहेत असे देखील सहाय्यक आयुक्तानी सांगितले.

त्रुटी दूर करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा ही मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे मजदूर युनियनच्या वतीने ठरविण्यात आले आहे. लेकरांच्या हक्कासाठी म्हणत कामगारांनी स्वाधार साठी आंदोलन सुरु केले आहे.

या अंदोलनाचे नेतृत्व गंगाधर गायकवाड, उज्ज्वला पडलावर, श्याम सरोदे, जयराज गायकवाड, डीवायएफआय चे जिल्हा सचिव स्टॅलिन आडे, एसएफआयचे पवन जगदमवार, करवंदा गायकवाड, मारोती केंद्रे, लता गायकवाड, सं.ना. राठोड, किरण इंगोले, सोमाजी सरोदे, सचिन खंदारे, नवनाथ वाकोडे, विशाल भद्रे, गणेश सोनटक्के, सोपान लांडगे, विशाल कंधारे, मंगेश देवकांबळे, मधुकर वाघमारे आदींनी नेतृत्व केले आहे. अद्यापही आंदोलन सुरु असून अनेक कार्यकर्ते समाज कल्याण कार्यालयात मुक्कामी आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय