सातारा : राज्य सरकारच्या लॉकडाउनच्या निर्णयाविरोधात भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी सातारा येथील पोवाईनाका येथे आंदोलन केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील झाडाखाली पोतं टाकून त्यावर बसत भीक मागो आंदोलन केले. यावेळी गरीब जनता, नोकरदार व शेतकरी वर्गाची आज आर्थिकदृष्ट्या अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. लॉकडाऊनची अशीच परिस्थिती पुढे राहिली तर जनतेच्या हातात नक्कीच कटोरा आल्याशिवाय राहणार नाही अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
आज सर्व मंत्री आमदार व अधिकारी घरामध्ये निवांत बसले असतील पण अशीच परिस्थिती राहिली तर लोक तुम्हाला घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असेही उदयनराजे भोसले म्हणाले. यावेळी उदयनराजे यांनी सचीन वाझे प्रकरणासह इतर अनेक विषयांवर राज्यसरकारवर टीका केली. या आंदोलनामुळे साताऱ्यातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली.