Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपावसाळी पर्यटन : ताम्हिणी घाट-निसर्ग सौंदर्याचा थाट

पावसाळी पर्यटन : ताम्हिणी घाट-निसर्ग सौंदर्याचा थाट

ताम्हिणी घाट हा एक डोंगराळ घाट असून, हा घाट मुळशी व ताम्हिणी नावाच्या गावांमध्ये स्थित आहे. पुण्यामधून कोकण मध्ये दळणवळणासाठी अतिरिक्त प्रवास मार्गांची गरज भासत असल्याकारणाने या दृष्टिकोनातून पर्वतरांगा छेदून ताम्हणी घाटाची निर्मिती करण्यात आली. ताम्हिणी घाट हा साधारणतः १५ किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत विस्तारला आहे. ताम्हिणी घाटाचे सौंदर्य हे त्याच्या आजूबाजूच्या असलेल्या उंच हिरव्यागार डोंगररांगांनी, धबधब्यांनी, नाल्यांनी व आजूबाजूच्या विहंगम दृश्यामुळे परिपूर्ण आहे. पुणे आणि कोकणाला जोडणारा हा घाट आहे. सह्याद्रीच्या माथ्यावर असलेला हा घाट पावसाळा सुरू झाल्यावर या घाटामध्ये अनेक धबधबे उगम पावतात आणि दूरदूरहून आलेल्या पर्यटकांना भुरळ घालतात.

माणगाव तालक्यातील पाटणूस, भिरा, विळे, रवाळजे व रायगड जिल्ह्याच्या वेशीवर असलेला पुणे जिल्ह्यातील ताम्हणी घाट रायगड जिल्ह्यातील सर्व गावाना जोडतो. श्रीवर्धन, माणगाव, अलिबाग या महत्वाच्या व्यापारी शहरातून पुण्याकडे जाणारी येणारी व्यापारी वाहने याच घाटाचा वापर करत आहेत. जैवविविधता अनेकांना भुरळ घालत आहे. पावसाळ्यात तर येथील निसर्गसौंदर्य म्हणजे स्वर्गाची अनुभूती असते. म्हणूनच सध्या येथे असंख्य पर्यटक व निसर्गप्रेमींची अलोट गर्दी होत आहे. पुण्याहून कोकणात येण्यासाठी हा मार्ग प्रवासाच्या दृष्टीकोनातून जवळ असल्यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या घाटातील खोल दर्‍या हे प्रवाशांचे आकर्षण झाले आहे.



मुंबई ते ताम्हिणी घाट अंतर व आवश्यक कालावधी – मुंबई ते ताम्हिणी घाट हे अंतर साधारणता १४४ किलोमीटर एवढे असून, साधारणतः ४ तास एवढा कालावधी लागू शकतो. पुणे ते ताम्हिणी घाट अंतर व आवश्यक कालावधी – पुणे ते ताम्हिणी घाट अंतर हे साधारणतः ५४ किलोमीटर असून, त्यासाठी लागणारा कालावधी हा २ तास आहे. ताम्हिणी घाटातून मुळशी धरणाच्या बॅकवॉटरकडे जाणारा रस्ता जो पळसे येथील धबधब्याकडे जातो. या धबधब्यावर आजकाल गर्दी होत आहे. याच घाटाच्या जवळ आपल्याला देवकुंड धबधबा पाहायला मिळतो. या धबधब्याचे सौंदर्य अप्रतिम आहे. हा धबधबा पाहण्यासाठी देखील पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. खरो फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर, भारतभरातून हा निसर्गाचा अमूल्य ठेवा पाहण्यासाठी व प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पर्यटक व अभ्यासक येतात. युनेस्कोने पश्चिम घाट संरक्षित जाहीर केलेला त्याच क्षेत्रात हा घाट येतो.

तुम्ही पावसाळी पर्यटनाची मोठी सुटी घेतली असेल तर या घाटातून पुढे तुम्ही माणगाव रोहा मुंबई गोवा हायवेने पोलादपूर, महाड पर्यंत जाऊ शकता, येथील पर्जन्यमान किमान २०० मिमी असते. घाटातून खाली उतरताना दोन्ही बाजूला मोठे धबधबे आहेत, अतिशय पाऊस असताना हे धबधबे धोकादायक व जीवघेणे ठरू शकतात. एकूण १५ किमी लांबीच्या या घाटातून जाताना ग्रामीण पिठलं भाकरी, कांदाभजी, कोकणी भात, वरण,आमटी, चपाती इ स्वादिष्ट भोजन देणारी हॉटेल्स, निवासी सुविधा आहेत.


येथे कोकणी पद्धतीचे मांसाहारी विशेषतः मासे, खेकडे, गावरान कोंबडीचे चिकन, मटण, सुकट बोंबील ईई आणि तांदळाची भाकरी ईई सारे काही उपलब्ध आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी माकडाच्या टोळ्या दोन्ही बाजूला शांतपणे उड्या मारताना आढळतील, मात्र त्यांना छेडू नका. येथील रात्रीच्या निवासावेळी पावसाचा आणि धबधब्यांचा आवाज निसर्गाच्या अनुभूतीची जाणीव करून देतो. तर निघा आता पर्यटनाला आणि हो उतारावरून वाहने चालवताना तुम्ही वेगावर नियंत्रण ठेवा.

क्रांतिकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड

संबंधित लेख

लोकप्रिय