ता-बारामती
बारामती तालुक्यात ३०० मेंढ्या चराई साठी घेऊन आलेल्या मेंढपाळ बांधवांना कल्याणीताई वाघमोडे यांनी भेट दिली. त्यांच्याशी विचारपूस करून घेतली, तेव्हा लक्षात आले, अश्या महाराष्ट्रातील अनेक घडलेल्या घटना समोरही येत नाहीत. काही घटना आज सोशल मिडियामुळे जनतेपर्यंत पोहचत आहेत.
पुरंदर तालुक्यातील न्हावरी जवळील हे मेंढपाळ भटकत एक महिनापासून इंदापूर ,बारामती मध्ये आहेत. मागील महिन्यात चराई करताना जवळपास ४० मेंढ्या मृत्यू पावल्या असल्याचे त्यांनी सांगितले परंतु गवत खाऊन मेंढ्या मेल्या,असा अहवाल त्यांना देण्यात आला. कोणतीही शासकीय मदत अथवा भरपाई त्यांना मिळाली नाही. तसेच लाॅकडाउन काळात ठाणे कल्याण भागात अडकल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
महाराष्ट्रात मेंढपाळांवरील हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे अनेक मेंढपाळांना त्रास सहन करावा लागत आहे . याबाबत कोणताही कायदा नसल्यामुळे मेंढपाळांवर अमानुषपणे मारहाण तेथील प्रस्थापितांनाकडून किंवा वन अधिकारीे- कर्मचारी वर्गाकडून केली जात आहे. अशा अनेक घटना या वर्षभरात पुढे आलेल्या आहेत.
कल्याणीताई वाघमोडे यांनी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे निवेदनाद्वारे मेंढपाळांच्या चराई प्रश्नाचा ,व मेंढपाळवरील होणार्या अन्यायाचा गंभीर प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी केली आहे.
मागे देखील अनेक आंदोलनातून मेंढपाळांच्या प्रश्नाचा उल्लेख वारंवार करण्यात आला आहे.तरीदेखील प्रशासन व सरकारकडून मेंढपाळांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष केले जात आहे, असे दिसत आहे. मागील सरकारने देखील अनेक योजनांची आश्वासने दिली होती परंतु ती पूर्णत्वास गेली नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे मेंढपाळांच्या हल्ल्यासंदर्भात न्याय मिळावा यासाठी समाजातील अनेक बांधवांनी निवेदने दिली आहेत.
कल्याणी वाघमोडे यांनी गेली दहा वर्षापासून वेळोवेळी समाजाच्या प्रश्नासाठी आवाज उठवलेला आहे .त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चराई क्षेत्राबाबत निर्णय घ्यावा, मेंढपाळांवर व महिला भगिनींवर होणारे अन्याय -अत्याचार रोखण्यासाठी कायदा करावा, मेंढपाळांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात, यासाठी सर्वतोपरी विचार व्हावा तसेच अनेक वर्षापासूनची धनगर समाजाचे अनुसूचित जमातीचे घटनात्मक आरक्षण लागू करावे , अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकार व प्रशासनाने कोरोना संकटाबरोबरच वर्षानुवर्षे मेंढपाळ व धनगर समाजाला भेडसावत असणार्या समस्यांचे प्राधान्याने निराकरण करावे, असे स्पष्ट मत व्यक्त केले. हक्काच्या सामाजिक विकासाच्या मागण्यांसाठी वारंवार रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते, तरीदेखील न्याय मिळत नसेल तर हे मोठे दुर्दैव आहे, अशी शोकांतिका क्रांती शौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केली.