मणिरत्नम दिग्दर्शित पीएस 1 या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. 500 कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांना बाहुबलीची आठवण झाली असून काहींनी हा चित्रपट बाहुबलीपेक्षा भारी असल्याचं म्हटलं आहे.
या चित्रपटाची कथा एक हजार वर्षं जुन्या चोल राजवंशाच्या कहाणीवर आधारित आहे. चोल वंशाचा पहिला राजराजा चोल याच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतला आहे. कल्की कृष्णमूर्ती यांच्या 1955मध्ये लिहिलेल्या पोन्नियन सेल्वन या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. ही कथा दहाव्या शतकात घडते.
या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन आणि व्हिएफएक्स पाहायला मिळणार असं या ट्रेलवरून दिसत आहे. या चित्रपटाला ए आर रेहमान यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटातून ऐश्वर्या राय बच्चन चार वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात तिचा डबल रोल असणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या नंदिनी आणि तिची आई मंदाकिनी अशा दुहेरी भूमिकेत दिसेल.
मणिरत्नम दिग्दर्शित हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळमसहित हिंदीतही प्रदर्शित केला जाणार आहे. ऐश्वर्याखेरीज या चित्रपटात तृषा कृष्णन, विक्रम, कर्थी, जयम रवी, शोभिता धूलिपाला आणि प्रकाश राज यांच्या भूमिका असणार आहेत. मणिरत्नम यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेला पोन्नियन सेल्वन 1 हा चित्रपट येत्या 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
सोर्स : सामना