Thursday, December 26, 2024
Homeआरोग्यराजस्थानातील मारवाडी माणुसकीने धावला कोविड रुग्णांच्या मदतीला

राजस्थानातील मारवाडी माणुसकीने धावला कोविड रुग्णांच्या मदतीला

देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी…

तो आला अन् एक लाख रुपये हातावर देऊन गेला !

सुरगाणा (दौलत चौधरी) : देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी… याचा प्रत्यय एका मारवाडीने राजस्थान मधून एक लाख रुपये कोविड १९ जननिधीत दिलेल्या देणगीच्या रुपाने आला आहे. जोवरी पैसा तोवरी बैसा अशी म्हण पैशाच्या बाबतीत प्रचलित असली तरी तो आला अन हातावर तुरी देऊन गेला ऐवजी तो आला अन हातावर एक लाख रुपये देऊन गेल्याने ‘देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’ या पंक्ती सार्थ ठरत आहेत. 

कोविड मदती करीता अनेकांनी मदतीचा हात पुढे करीत शिक्षकांनी केलेल्या निधी संकलनाच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे शिक्षक रतन चौधरी यांनी एक शालेय मित्र म्हणून आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत मुक्तहस्ते निधी दिल्याने आरोग्याच्या अनेक सुविधा उपलब्ध  करून देण्यास देणगीतून हातभार लागत आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुमारे १९५४ साली राजस्थानातील मारवाड जंक्सन तालुक्यातील  सिरियारी या छोट्याशा गावातून जिल्हा पाली येथून रोजीरोटीच्या शोधार्थ व्यापारा निमित्ताने एक मारवाडी कुटूंब सोहनदास वैष्णव हे पत्नी शांतीदेवी सोबत येथे आले होते. त्याकाळी खेडोपाडी रस्त्याची वाणवा, वीज, आरोग्य, शिक्षण, दळणवळण अशा कितीतरी अडचणींना सामोरे जात हे कुटुंब उंबरठाण  येथे स्थायिक झाले होते. सुमारे सत्तर वर्षापासून या मारवाडी कुटुंबाची नाळ आदिवासी समाजाशी जुळली होती. आज जरी ते उंबरठाण येथे नसून गुजरात सिमेवरील निंबारपाडा येथे व्यवसाय करीत असले तरी ‘अहिंसा परमो धर्म. मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा’ या उक्तीनुसार गोपाळदास वैष्णव यांनी वडील कै. सोहनदास वैष्णव यांच्या स्मृती पित्यार्थ “सुरगाणा कोविड १९ जननिधीत रुग्णांच्या सेवेसाठी एक लाख रुपये देणगी धनादेशद्वारे तहसिलदार किशोर मराठे यांच्या कडे सुपूर्द केले आहेत.

दीड वर्षापासून व्यवसाय बंद असूनही निधी दिल्याने या मारवाडी कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कुटुंबाने दुष्काळ उपासमारीच्या काळात आदिवासी समाजा करीता अनेक वेळा माणुसकी दाखवत मदतीचा हात पुढे केला होता. गोपाळदास वैष्णव  यांनी जिल्हा परिषदेच्या गरजू विद्यार्थ्यांना लेखन साहित्य तसेच बाक दिले आहेत. देवीपाडा येथील मरदेवी मंदिर, उंबरठाण येथील जामा मस्जिद, निंबारपाडा येथील मारुती मंदिर या ठिकाणी भाविकांच्या बैठकीसाठी बाक दिले आहेत. तर अयोध्या  येथेल राम मंदिराकरीता एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली आहे.

“आमचे कुटूंब सुमारे सत्तर वर्षा पासून अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवां समवेत रहात असल्याने आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या कृतज्ञ संवेदनशील भावनेने कमविलेला थोडासा हिस्सा गोरगरीब रुग्णांच्या सेवेकरीता कठीण प्रसंगात उपयोग व्हावा या करीता मदतीचा हात पुढे केला आहे.”

– गोपाळदास वैष्णव, मारवाड राजस्थान पाली

अतिदुर्गम तसेच आर्थिक परिस्थिती चांगली नसतांना तालुका शिक्षक, शिक्षण विभाग, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, पंचायत समितीचे महसूल विभाग एकत्र येत कोविड जन निधी जमा करीत कोविड रुग्णासाठी सुरगाणा रुग्णालयात सुसज्ज 30 ऑक्सिजन खाटांची उभारणी करण्यात आली आहे. 

अनेक दानशूर व्यक्तींनी वेळीच मदतीचा हात पुढे केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन खाटा शोधण्याची धावपळ थांबली आहे. सोशल मीडियाच्या ‘कोविड देवदूत मदत निधी’ गृपच्या माध्यमातून रामभाऊ थोरात, भगवान आहेर, ग्रामसेवक वसंत भोये, एकनाथ बिरारी, रतन धुम, डॉ.सुरेश पांडोले,  डॉ.दिनेश चौधरी, डॉ. कमलाकर जाधव, डॉ. प्रविण पवार, कृषी सहायक गुलाब भोये, भास्कर चौधरी, शिक्षक पांडुरंग पवार, रतन चौधरी, तुकाराम अलबाड, मनोहर चौधरी, भास्कर  बागुल, एन.एस.चौधरी,  नाना ढुमसे, केशव महाले, देविदास देशमुख, पांडुरंग वाघमारे, तुकाराम भोये, मोतीराम भोये, सुधाकर भोये, राजेंद्र गावित, राजू चौधरी हे आवाहन करीत असून दानशूरांनी उत्तम प्रतिसाद देत वीस ते पंचवीस  दिवसात जननिधी खात्यात लाखो रुपये जमा झाले आहेत. 

संबंधित लेख

लोकप्रिय