Friday, November 22, 2024
Homeराज्यमधकेंद्र योजना : शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी

मधकेंद्र योजना : शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2019 पासून मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तो एक नाविण्यपूर्ण उद्योग आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मधमाशा पालन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते.

योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता :

1) वैयक्तिक मधपाळ : या योजनेसाठी अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येते. वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती या योजनेसाठी पात्र असते.

2) वैयक्तिक केंद्र चालक (प्रगतशील मधपाळ) : या योजनेसाठी किमान 10 वी पास, वय वर्षे 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नांवे किमान 1 एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थींकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

योजनेची वैशिष्ट्ये :

या योजनेंतर्ग मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक अशाप्रकारे या योजनेचे स्वरुप आहे. शासनाच्या हमी भावाने मध खरेदी करण्यात येतो. विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा देण्यात येते. मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करण्याचे काम या योजनेंतर्गत करण्यात येते.

अटी व शर्ती :

लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपूर्वी लाभार्थींनी 50 टक्के स्वगुंतवणूक रक्कम भरणा करणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी उस्मानाबाद येथील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद (द्वारा – जिल्हा उद्योग केंद्र), प्रशासकीय इमारत समोर, (दूरध्वनी क्रमांक : 02472- 222301) उस्मानाबाद – 413501 ई-मेल आयडी : dviosman@rediffmail.com येथे संपर्क साधवा तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सातारा येथील संचालक, मध संचालनालय, सरकारी बंगला नं.5, महाबळेश्वर, जिल्हा- सातारा, पिन : 412806 (दुरध्वनी : 02168-260264) यांच्याशी संपर्क साधावा.

संबंधित लेख

लोकप्रिय